त्रिपुरात माणिक साहा नवे मुख्यमंत्री; निवडणूक तयारीसाठी विप्लव देव यांचा राजीनामा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 06:05 IST2022-05-15T06:04:59+5:302022-05-15T06:05:29+5:30
त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

त्रिपुरात माणिक साहा नवे मुख्यमंत्री; निवडणूक तयारीसाठी विप्लव देव यांचा राजीनामा!
आगरतळा:त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी शनिवारी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, पक्षकार्यासाठी पदाचा राजीनामा दिल्याचे देव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, माणिक साहा यांची त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवसायाने दंतवैद्यक असलेल्या साहा यांची गेल्याच महिन्यात राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती झाली होती.
पुढील वर्षी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी विप्लव देव यांना राजीनामा देण्याचे आदेश पक्षाने दिल्याचे म्हटले जात आहे. आपल्या कार्यकाळात मुख्यमंत्रिपदाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले.
मुख्यमंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल पक्षाचा आभारी आहे. आता पक्षाने संघटनात्मक जबाबदारी सोपवली असून, पक्ष मजबूत करण्यासाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून यापुढे काम करत राहीन, असे विप्लव देव यांनी राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.