भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:27 IST2025-07-24T12:27:18+5:302025-07-24T12:27:59+5:30
सरकाघाट परिसरातील मसेरनजवळील तरांगला येथे एचआरटीसी बसचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

फोटो - आजतक
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सरकाघाट परिसरातील मसेरनजवळील तरांगला येथे एचआरटीसी बसचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. सरकाघाटहून जमनी दुर्गापूरला जात असताना बस अचानक दरीत कोसळली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये एकूण २० ते २५ प्रवासी होते. तरांगलाजवळील मासेरन परिसरात बस पोहोचताच ती अचानक दरीत कोसळली. या अपघातात बसचं मोठं नुकसान झालं, तसेच अनेक प्रवासी आतमध्ये अडकले.
मंडी के सरकाघाट में खाई में गिरी #HRTC बस pic.twitter.com/W39W3pjj7p
— Rajesh Sharma (@sharmanews778) July 24, 2025
अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. स्थानिक लोकांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केलं. लोकांनी घटनेची माहिती पोलीस-प्रशासनाला दिली. काही वेळातच १०८ रुग्णवाहिका आणि सरकाघाटचे डीएसपी संजीव गौतम त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णवाहिकेतून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.
जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात २ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती डीएसपी संजीव गौतम यांनी दिली. मृतांची ओळख पटवली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनेमागील कारण तपासलं जात आहे.