Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:30 IST2025-12-16T13:29:01+5:302025-12-16T13:30:31+5:30
अतुल मनालीतील एका ठिकाणी आहे. तो कॅमेऱ्यात दाखवतो की, दूरदूरपर्यंत डोंगर सुकलेले दिसत आहेत.

Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
डिसेंबर महिना म्हणजे बर्फवृष्टीचा आनंद घेणं. म्हणूनच अनेक जण याच दरम्यान मस्त थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण जर मनालीला पोहोचल्यावर बर्फाच्या नावाखाली तुमच्यासोबत स्कॅम झाला तर नक्कीच खूप वाईट वाटेल. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर अतुल चौहान नावाच्या एका पर्यटकाने मनालीचं जे सत्य दाखवलं ते इंटरनेटवर १.१ कोटी लोकांनी पाहिलं आहे. अतुलचा दावा आहे की, त्याच्यासोबत 'स्नो ॲक्टिव्हिटीच्या नावावर मोठा स्कॅम झाला आहे.
९ डिसेंबर रोजी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये अतुल मनालीतील एका ठिकाणी आहे. तो कॅमेऱ्यात दाखवतो की, दूरदूरपर्यंत डोंगर सुकलेले दिसत आहेत. बर्फाचं नामोनिशाण नाही. पण मध्ये एका छोट्याशा जागेवर थोडासा बर्फ (कदाचित कुठूनतरी आणून टाकला असेल) गोळा करण्यात आला आहे. आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, त्याच 'किरकोळ बर्फाच्या' तुकड्यावर पर्यटकांना स्केटींग आणि फोटो काढण्यासारख्या एक्टिव्हिटीज करायला लावल्या जात आहेत.
व्हिडिओमध्ये अतुल वैतागून म्हणतो - "इथे पाहा आपल्यासोबत कसा स्कॅम होतो आहे... एवढासा बर्फ या लोकांनी जमा केला आहे. इथेच हे लोक आम्हाला सगळ्या एक्टिव्हिटीज करायला लावत आहेत. ना इकडे काही आहे, ना तिकडे... आम्हाला मूर्ख बनवलं जात आहे." या व्हिडिओला आतापर्यंत १.८ लाख लाईक्स मिळाले आहेत, पण खरी मजा कमेंट सेक्शनमध्ये आहे. लोक पर्यटकांच्या परिस्थितीची मजाही घेत आहेत आणि सहानुभूतीही दाखवत आहेत.
एका युजरने म्हटले - "यापेक्षा जास्त बर्फ माझ्या फ्रीजमध्ये आहे." दुसऱ्याने लिहिले - "ग्रीन स्क्रीनही लावली आहे, बाकीचा बर्फ एडिटिंग करताना जोडून घ्या." त्याचबरोबर अनेक युजरनी 'भाई, काश्मीरला या' असा सल्ला दिला. त्याचप्रमाणे अन्य एका युजरने लिहिलं की, 'भाऊ, तुमच्यासाठी खरंच वाईट वाटत आहे.' तर काही युजरनी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.