Leopard Attack: घरात घुसलेल्या बिबट्याशी भिडला, झटापटीत बिबट्याचा मृत्यू, तरुणही गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:42 IST2026-01-24T15:38:01+5:302026-01-24T15:42:02+5:30
Odisha Leopard Attack News: ओडिसातील कटक जिल्ह्यातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली. झोपेत असताना घरात घुसलेल्या बिबट्याने हल्ला केला, पण मृत्यूसमोर उभा असतानाही हा तरुण डगमगला नाही.

Leopard Attack: घरात घुसलेल्या बिबट्याशी भिडला, झटापटीत बिबट्याचा मृत्यू, तरुणही गंभीर जखमी
ओडिशातील कटक जिल्ह्यातील नरसिंहपूर येथे एका तरुणाने दाखवलेल्या अचाट धैर्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. घरात घुसून हल्ला करणाऱ्या बिबट्याशी या तरुणाने दोन हात केले. या भीषण संघर्षात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंहपूर येथील अनंत प्रसाद गावात समर भोळ नावाचा तरुण आपल्या घरात झोपला. शुक्रवारी रात्री अचानक एका बिबट्याने घरात प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या समरवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरून न जाता, समरने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज दिली. दोघांमध्ये झालेल्या या संघर्षात बिबट्याचा मृत्यू झाला.
बिबट्याशी झालेल्या या लढाईत समर भोळ याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने नरसिंहपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याचा देह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, वन विभागाने गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.