गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:35 IST2025-05-03T15:34:08+5:302025-05-03T15:35:28+5:30
आईला न सांगता गर्लफ्रेंडला भेटायला जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आईला न सांगता गर्लफ्रेंडला भेटायला जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एका चौकात चायनीज खात होता. त्याच रस्त्यावरून त्याचे आई-बाबा जात होते. मुलाला एका मुलीसोबत पाहताच आई प्रचंड चिडली. त्यांना जोरजोराने ओरडू लागली. हे पाहताच मुलाची गर्लफ्रेंड तिच्या स्कूटरवरून पळून जाऊ लागली.
तरुणाच्या आईने धावत जाऊन दोघांनाही पकडलं आणि मग भररस्त्यात तुफान राडा झाला. आईने सर्वात आधी आपल्या मुलाला चपलेने धू धू धुतलं आणि नंतर त्याच्या गर्लफ्रेंडचेही केस ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहताच आजूबाजूला लोकांची गर्दी जमली. लोकांनीच दोघांनाही आईच्या तावडीतून सोडवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
गुजैनी येथील एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी रामगोपाल चौकात पोहोचली. दोघेही भेटले, गप्पा मारल्या. त्यानंतर खाण्यासाठी एका चायनीजच्या दुकानात गेले आणि चायनीज खाऊ लागले. मुलगा त्याच्या आईशी खोटं बोलून आला होता. याच दरम्यान, आई काही कामासाठी चौकातून जात असताना, तिने तिच्या मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना पाहिला. मग आई रागावली आणि तिने चौकात दोघांनाही शिवीगाळ करायला सुरुवात केली.
आईने मुलाला चपलेने मारायला सुरुवात केली. त्यावेळी गर्लफ्रेंडने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. तिलाही मारहाण करण्यात आली. रस्त्यावर राडा होताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणलं. येथे दोघांचंही समुपदेशन करण्यात आलं आणि त्यांना त्यांच्या घरी परत पाठवण्यात आलं. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.