'ती' मॅच ठरली शेवटची! बॅडमिंटन खेळताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 15:37 IST2023-06-02T15:31:16+5:302023-06-02T15:37:38+5:30
बॅडमिंटन खेळत असताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

'ती' मॅच ठरली शेवटची! बॅडमिंटन खेळताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू
तेलंगणामध्ये बॅडमिंटन खेळत असताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने एक तरुण जमिनीवर पडल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. त्याच्या मित्रांनी खूप प्रयत्न करून श्वास परत आणण्याचा प्रयत्न केला, पण काहीही फायदा झाला नाही. या घटनेनंतर तरुणाचे कुटुंबीय आणि मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुसा व्यंकट राजा गंगाराम हा तरुण शुक्रवारी सकाळी आपल्या काही मित्रांसह राज्यातील जगित्याला जिल्ह्यातील जगित्याला क्लबमध्ये फिरायला आला होता. चालल्यानंतर सर्वांनी तिथे बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. बुसा मित्रांसोबत बॅडमिंटनही खेळायचा. पण यावेळी त्याचं हे खेळणं शेवटचं ठरलं, या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बुसा त्याच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. हिरव्या रंगाचं टी-शर्ट घातलेला बुसा, हातात रॅकेट धरून थोडा थरथरायला लागतो आणि स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मित्रांना काही समजण्याआधीच बुसा खाली कोसळतो.
घटनास्थळी उपस्थित असलेले सर्व मित्र आणि इतर लोक त्याचा श्वास परत आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही उपयोग झाला नाही. त्यानंतर लगेचच बुसाला उपचारासाठी रुग्णालयात नेले जाते. मात्र बुसाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.