परस्त्रीला वश करण्यासाठी त्यानं घुबड मारलं, पण विपरीत घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 09:17 IST2018-11-13T09:02:32+5:302018-11-13T09:17:32+5:30

अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला अटक

Man in delhi Kills Owl To Hypnotize Woman | परस्त्रीला वश करण्यासाठी त्यानं घुबड मारलं, पण विपरीत घडलं

परस्त्रीला वश करण्यासाठी त्यानं घुबड मारलं, पण विपरीत घडलं

ठळक मुद्देघुबडाचा बळी देणाऱ्या व्यक्तीला अटकपरस्त्रीला वश करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी घुबडाचा बळीदिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: माणूस अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यावर तो माणूस राहात नाही, असं म्हणतात. दिल्लीच्या सुल्तानपुरीमध्ये याचाच प्रत्यय देणारी घटना घडली आहे. परस्त्रीला वश करण्यासाठी एका विवाहित व्यक्तीनं दिवाळीत एका घुबडाचा बळी दिला. यामुळे परस्त्री आपल्या कह्यात येईल, असं त्या व्यक्तीला वाटलं होतं. मात्र तसं काहीच घडलं नाही. उलट घुबडाचा बळी देणाऱ्या व्यक्तीच्या वडिलांचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. 

परस्त्रीला आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी विवाहित व्यक्तीनं मंत्र-तंत्राचाही आधार घेतला. विशेष म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतरही संबंधित व्यक्ती दररोज रात्री विचित्र क्रियाकर्म करायची. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांना भीती वाटू लागली. त्यांनी याबद्दलची तक्रार पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या घरी रविवारी रात्री छापा टाकला. त्यावेळी त्यांना एक घुबड मृतावस्थेत कूलरमध्ये सापडलं. 

घुबडाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीचं नाव कन्हैया असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली. त्याचं वय 40 वर्ष असून तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. तो पत्नी आणि तीन मुलांसह सुल्तानपुरीतील सी ब्लॉकमध्ये राहतो. घुबड्याचा बळी दिल्यावर महिलेला वश करता येतं. याशिवाय धनप्राप्तीदेखील होते, असं कन्हैयाला त्याच्या एका नातेवाईकानं सांगितलं होतं. त्याच नातेवाईकाकडून कन्हैयानं घुबड आणलं होतं. त्या नातेवाईकाचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. 
 

Web Title: Man in delhi Kills Owl To Hypnotize Woman

टॅग्स :delhiदिल्ली