अंगावरुन तीन ट्रेन जाऊनही वाचला; पोलीस येताच 'पापा आ गये' म्हणत उठला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 20:12 IST2019-10-22T20:10:20+5:302019-10-22T20:12:30+5:30
आश्चर्यजनक घटना पाहून पोलीस अवाक्

अंगावरुन तीन ट्रेन जाऊनही वाचला; पोलीस येताच 'पापा आ गये' म्हणत उठला!
भोपाळ: अंगावरुन तीन ट्रेन जाऊनही जीव वाचल्याची आश्चर्यजनक घटना मध्य प्रदेशात घडली. अशोक नगर भागात एक व्यक्ती रेल्वे रुळांवर झोपला होता. त्यावेळी त्याच्या अंगावरुन तीन ट्रेन गेल्या. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तीन ट्रेन गेल्यानं व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी पोलिसांची समजूत झाली. मात्र पोलिसांना पाहताच रुळावर झोपलेली व्यक्ती उठली आणि 'पापा आ गये' म्हणू लागली.
अंगावरुन तीन ट्रेन जाऊनही एखादी व्यक्ती वाचण्याची शक्यता अतिशय कमी असते. मात्र मध्य प्रदेशच्या अशोक नगरमध्ये हा आश्चर्यजनक प्रकार घडला. ट्रेनच्या लोकोमोटिव्ह पायलटनं रेल्वे रुळांवर एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत संबंधित व्यक्तीच्या अंगावरुन तीन ट्रेन गेल्या होत्या. त्यामुळे रुळावरील व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांना वाटलं. मात्र पोलिसांना पाहताच रुळावर पडलेली व्यक्ती 'पापा आ गये' म्हणत ओरडू लागली.
पोलिसांना संबंधित व्यक्तीची चौकशी करताच त्याचं नाव धर्मेंद्र असल्याचं समजलं. धर्मेंद्र मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे तो रेल्वे रुळांवर कधी झोपला हे त्यालादेखील आठवत नव्हतं. त्याच्या अंगावरुन तीन ट्रेन गेल्या याची त्याला कल्पनादेखील नव्हती. त्याच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांनी देताच धर्मेंद्र शुद्धीवर आला. तो अशोक नगर रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे रुळांवर झोपला होता. धर्मेंद्रला वैद्यकीय तपासणीनंतर घरी पाठवण्यात आलं.