'ममता दीदी पंतप्रधान...', राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत TMC समर्थकांनी दाखवले पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 19:37 IST2024-01-28T19:36:26+5:302024-01-28T19:37:43+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे.

'ममता दीदी पंतप्रधान...', राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत TMC समर्थकांनी दाखवले पोस्टर
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमधून सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी या यात्रेला ममतांचा फोटो असलेले पोस्टर दाखवले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, टीएमसी समर्थक ममता बॅनर्जींचा फोटो असलेला फोटो यात्रेला दाखवत होता, ज्यावर "दीदी पंतप्रधान होतील" असे लिहिले होते.
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसने राज्यात स्वबळावर निडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मात्र, याची औपचारिक घोषणा झालेली नाही. एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राहुल गांधींच्या यात्रेत उपस्थित राहणार की नाही, हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत विरोधकांच्या इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे.
#WATCH | After a two-day hiatus, Congress leader Rahul Gandhi resumes Bharat Jodo Nyay Yatra from Jalpaiguri, West Bengal
— ANI (@ANI) January 28, 2024
Congress MP Rahul Gandhi started the yatra from Thoubal, Manipur on January 14. pic.twitter.com/7C3J5NQIHr
मल्लिकार्जुन खरगे यांचे ममतांना पत्र
यात्रा पुन्हा सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून सुरक्षा व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली होती. ही यात्रा रविवारी सिलीगुडीतील थाना मोड येथून एअर व्ह्यू मोडपर्यंत जाईल आणि त्यानंतर रात्री राहुल गांधी उत्तर मिदनापूरमधील सोनापूरला पोहोचतील. इथे राहुल यांची एक सभा होईल. रात्रभर तिथे विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा प्रवास 29 जानेवारीला सुरू होईल.
29 जानेवारीच्या रात्री बिहारमध्ये...
काँग्रेसची न्याय यात्रा 29 जानेवारीला बिहारमध्ये पोहोचणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्याय यात्रा 30 जानेवारीच्या रात्री अररिया, पूर्णिया आणि किशनगंज मार्गे पश्चिम बंगालला परतेल. यानंतर ही यात्रा मालदा, मुर्शिदाबाद आणि बीरभूममार्गे 31 जानेवारीला झारखंडला रवाना होईल.