'ममता बॅनर्जी ईडी-सीबीआयला घाबरल्या', UPA वर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 11:59 IST2021-12-02T11:59:47+5:302021-12-02T11:59:58+5:30
'आमचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत आहेत. त्यांच्याविरोधात अशी वक्तव्य देणे योग्य नाही.'

'ममता बॅनर्जी ईडी-सीबीआयला घाबरल्या', UPA वर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याचा पलटवार
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर केलेल्या टीकेला आता काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खर्गे यांनी ममतांवर भाजपला मदत करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी ममता अशी वक्तव्ये करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
आमचा नेता सर्वसामान्यांसाठी लढतोय
एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आमचे नेते राहुल गांधी देशातील प्रत्येक मुद्द्यावर लढत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण लढलं, कोण महागाईवर लढलं? प्रियांका गांधी युपीमध्ये लढत आहेत. आजही आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. प्रत्येक मुद्द्यावर आमचा लढा सुरूच आहे. आम्ही लढलो नसतो तर एवढ्या राज्यात आमचे सरकार स्थापन झाले नसते. आमच्याबद्दल असे वक्तव्य योग्य नाही, असेही खर्गे म्हणाले.
ममता ईडी-सीबीआयला घाबरल्या
ते पुढे म्हणाले, माझा नेता शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी, महिलांसाठी, महागाईविरोधात लढा देत आहे. जेव्हा तुम्ही लढवय्यांबद्दल अशी टीका करता, तेव्हा त्याचा भाजपला फायदा होतो. मला वाटतं की, ममता ईडी आणि सीबीआयला घाबरुन अशी वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे फक्त भाजपलाच फायदा होणार आहे. मला वाटतं की, भाजपविरोधात लढा द्यायचा असेल, तर अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत.
यूपीए आता आहे कुठे?
मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार यांची भेट घेतली आणि काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत भाजपविरोधात एकजुटीने लढा देण्यावर भर दिला. यूपीए आता आहे कुठे? यूपीए आता नाही, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत बुधवारी दिले.
परदेशात राहून राजकारण अशक्य
यावेळी ममतांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवरही टीका केली. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला लगावला. तसेच, तुम्ही काँग्रेसच्या विरोधात का लढत आहात, असा प्रश्न उपस्थितांपैकी एकाने विचारला. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेस आणि डावे पक्ष आमच्याविरोधात बंगालमध्ये लढले. त्यामुळे आता आम्हीही काँग्रेसविरोधात कंबर कसली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपल्याला हा लढा द्यावाच लागेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.