बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींना पाठवली 11 कोटींची नोटीस, आणखी 3 नेते रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:43 IST2025-02-12T14:42:58+5:302025-02-12T14:43:31+5:30
Mamata Banerjee : 8 महिने जुने प्रकरण; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींना पाठवली 11 कोटींची नोटीस, आणखी 3 नेते रडारवर
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि राज्यपाल, यांच्यात पुन्हा तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस, यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये तृणमूल नेत्यांनी राज्यपालांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तातडीने माफी मागितली नाही, तर 11-11 कोटी रुपयांचा मानहानीचा दंड ठोठावला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
तृणमूलच्या आमदार सायंतिका बॅनर्जी आणि रयत हुसैन सरकार, यां ही नोटीस पाठवण्यात आली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि आमदारांना बदनामीची नोटीस पाठवली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
मे 2024 मध्ये बंगाल विधानसभेच्या 2 जागांवर पोटनिवडणुका झाल्या, ज्यामध्ये बारानगर जागेवरून सायंतिका बॅनर्जी आणि भगवान गोला जागेवरून रयत सरकार विजयी झाले. दोन्ही आमदारांच्या शपथविधीबाबत अडचण निर्माण झाली होती. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना शपथ घेण्याचा अधिकार दिला नाही. त्या दोघांनाही उपसभापतींनी शपथ देण्यास सांगितले. पणष या दोन्ही आमदारांनी राजभवनात जाऊन शपथ घेण्यास नकार दिला.
राजभवन सुरक्षित नसल्याचा दावा या आमदारांनी केला. हा संपूर्ण प्रकार घडत असताना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजभवनाबाबत गंभीर टीका केली होती. राजभवनात महिला सुरक्षित नसल्याचे ममता म्हणाल्या. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाने ममतांना राजभवनाबाबत अशी टिप्पणी करू नये, असे सांगितले होते. या घटनेदरम्यान दोन्ही आमदारांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले होते, ज्यासाठी आता कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.