पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शंखनाद केला आहे. मंगळवारी पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील २९१ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. उर्वरित तीन जागा मित्रपक्ष भारतीय गोरखा डेमोक्रॅटिक फ्रंटसाठी सोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी बॅनर्जी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.
निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकताना ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, भाजप सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून आणि राज्याबाहेरून लाखो लोकांना आणून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. "मी भाजपला आवाहन करते की, ही निवडणूक छुप्या मार्गाने न लढता राजकीयदृष्ट्या लढा," असे थेट आव्हान त्यांनी यावेळी दिले. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला. आयोगावर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "तुम्ही भाजपच्या सांगण्यावरून खेळ खेळत आहात, पण हा खेळ गुप्तपणे का खेळला जात आहे? तुम्ही उघडपणे भाजपचा प्रचार का करत नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजपवर गंभीर आरोप
या निवडणुकीचे वर्णन बंगालच्या अस्तित्वासाठीची लढाई असे करताना मुख्यमंत्र्यांनी अनेक गंभीर आरोप केले. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षम बंगाली अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. "पंतप्रधान बंगालला लक्ष्य का करत आहेत? ईदपूर्वी दंगली भडकवण्याचा हा काही कट आहे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यात दंगली घडवण्यासाठी हरियाणातून लोकांची भरती केली जात असून बाहेरून शस्त्रे आणि पैसा आणला जात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. यासाठी त्यांनी तोसनिलनावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत, यामागे एक मुख्य सूत्रधार ढगामागे लपून बसल्याचा आरोप केला.