'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:06 IST2025-05-20T14:04:15+5:302025-05-20T14:06:10+5:30
पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश असू शकतो.

'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
'ऑपरेशन सिंदूर'चे सत्य जगासमोर मांडण्यासाठी आणि पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश असू शकतो. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांना पाठवण्यास सहमती दर्शवली आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी या शिष्टमंडळापासून स्वतःला दूर ठेवले होते. त्यांनी युसूफ पठाण यांना जाण्यापासून रोखले होते, असा दावा करण्यात आला होता. आधी टीएमसीमधील शिष्टमंडळात युसूफ पठाणचे नाव होते. पण, खासदार पठाण यांनी जाण्यास नकार दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्वतः ममता बॅनर्जींशी या प्रकरणी चर्चा केली होती. त्यांनी टीएमसीच्या प्रतिनिधीबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला तोंड देण्याबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी तृणमूल काँग्रेस केंद्राच्या बहुपक्षीय राजनैतिक मोहिमेवर बहिष्कार टाकत नाही आणि केंद्राकडून औपचारिक विनंती मिळाल्यानंतर ते आपले प्रतिनिधी पाठवेल, असे ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले.
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'जर विनंती आमच्याकडे आली तर आम्ही नक्कीच त्यावर विचार करू शकतो.' आम्ही नेहमीच केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन करतो. जर काही विशेष असेल तर आपण त्याचा विचार करू, पण आत्ता नाही. सध्या, आम्ही केंद्र सरकारच्या विचारांना आणि त्यांनी उचललेल्या पावलांना पाठिंबा देत आहोत. केंद्र सरकारला कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार नाही, असंही बॅनर्जी म्हणाल्या.
तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणाऱ्या सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांना दहशतवादाविरुद्ध देशाच्या भूमिकेचे दर्शन घडवण्यासाठी परदेशात पाठवावे. सीमापार दहशतवादाशी लढा देण्याच्या आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या बाबतीत सरकारच्या पाठीशी उभा आहे.