गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जबरदस्त हल्ला केला होता. दहशतवादी आणि पाकिस्तानला धडा शिकवून सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर आता भारतात या मुद्द्यावरूनही राजकारणाला तोंड फुटले आहे. तसेच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख छोटीशी लढाई असा केला आहे. तसेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना परखड सवाल विचारला आहे.
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख एक छोटीशी लढाई असा करत मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये काहीतरी धोका असल्याची चाहूल आधीपासूनच लागलेली होती. काहीतरी अघटित होईल, अशी शंका असल्याने १७ एप्रिल रोजी नियोजित असलेला दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केला. मात्र मोदींनी पर्यटकांना काश्मीरमध्ये जाण्यापासून का रोखले नाही. पहलगाममध्ये मोदी सरकारेन पर्टकटांना संरक्षण का दिले नाही, असा सवालही खर्गे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू झाला असला तरी ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही, तर केवळ स्थगित झालेलं आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे. जर पाकिस्तानने आगळीक केली तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही भारताने दिला आहे. तसेच या कारवाईनंतर भारत सरकारने संरक्षणासाठीच्या अर्थसंकल्पामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.