Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:54 IST2025-07-31T12:54:14+5:302025-07-31T12:54:50+5:30
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सात आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज एनआयए कोर्टाने निकाल दिला. या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या प्रकरणातील सर्व साक्षीदार त्यांच्या सुरुवातीच्या दाव्यांपासून मागे हटले होते. त्यामुळे कोणालाही दोषी ठरवता आले नाही. या निकालानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी त्यांनी भगव्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे. हे सांगताना त्या न्यायालयात खूप भावनिक झाल्या आणि रडू लागल्या. प्रज्ञा म्हणाल्या की, 'न्यायालयाचा हा निर्णय फक्त माझाच नाही तर भगव्याचाही विजय आहे. या प्रकरणात प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहित यांची खूप चर्चा झाली. एवढेच नाही तर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तत्कालीन यूपीए सरकारवर हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांचा छळ केल्याचा आरोप केला होता.
एनआयए कोर्टात न्यायाधीशांना उद्देशून प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, 'मी सुरुवातीपासूनच म्हणाले होते की ज्याला चौकशीसाठी बोलावले जाते, त्याच्या मागे काहीतरी आधार असला पाहिजे. मला चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि मला अटक करण्यात आली. छळ करण्यात आला. यामुळे माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी साधूचे जीवन जगत होते पण माझ्यावर आरोप झाले आणि कोणीही आमच्या बाजूने उभे राहिले नाही. मी जिवंत आहे कारण मी संन्यासी आहे. त्यांनी कट रचून भगव्याला बदनाम केले. आज भगवा जिंकला आहे, हिंदुत्व जिंकले आहे आणि देव दोषींना शिक्षा देईल.
युपीए सरकार काळात हे प्रकरण होते चर्चेत
आज निकाल जाहीर झाला तेव्हा प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतर सहकारी न्यायालयात उपस्थित होते. युपीए सरकारच्या काळात या प्रकरणाची चर्चा झाली होती. पी. चिदंबरम यांनी या प्रकरणात हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद असे शब्द वापरले होते. संघ परिवाराने यावर काँग्रेस आणि युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.