मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:56 IST2025-09-25T16:55:38+5:302025-09-25T16:56:21+5:30
Prasad Purohit News: लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता लष्कराने त्यांना पदोन्नती दिली आहे. लेफ्टिनेंट कर्नल पदावर असलेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
देशभरात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या कोर्टाने प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह भारतीय लष्करातील लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली होती. प्रसाद पुरोहित यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता लष्कराने त्यांना पदोन्नती दिली आहे. लेफ्टिनेंट कर्नल पदावर असलेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
एनआयएच्या विशेष न्यायालयाने ३१ जुलै रोजी प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सुटका केली होती. लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी काश्मीरमधून आरडीएक्स मागवलं होतं आणि त्यांच्याच घरी बॉम्ब तयार करण्यात आला होता, याबाबतचे कुठलेही पुरावे नसल्याने कोर्टाने नमूद केले आहे. प्रसाद पुरोहित यांना सुमारे १७ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर ही पदोन्नती मिळाली आहे. प्रसाद पुरोहित यांच्या पदोन्नतीच्या वृत्ताला लष्कराने दुजोरा दिला असून, पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पदोन्नतीनंतर आता प्रसाद पुरोहित यांचा कर्तव्यावर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२००८ साली महाराष्ट्रातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने प्रसार पुरोहित यांना अटक केली होती. दहशतवादाच्या आरोपाखाली अटक झालेले पुरोहित हे सेवेत असलेले लष्करातील एकमेव अधिकारी होते. सुमारे ९ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर २०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने पुरोहित यांना जामीन दिला होता. त्यानंतर ३१ जुलै २०२५ रोजी एनआयए कोर्टाने पुरोहित यांच्यासह सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.