आजची तरुण पिढी सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या नादात दररोज आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे. ट्रेंड फॉलो करण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवण्यात सध्या व्यस्त आहे. मध्य प्रदेशातील सिवनी येथे भयंकर घटना घडली. एका तरुणाला रील बनवताना ट्रेनची धडक बसली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घंसौर पोलीस स्टेशन परिसरातील सारसडोलजवळ ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण रेल्वे रुळाजवळ रील बनवत होते आणि फोटो काढत होते. तेव्हाच समोरून एक ट्रेन आली आणि ते रुळावरून बाजुला झाले. ट्रेन निघून गेल्यानंतर त्यांनी पुन्हा रील्स बनवायला सुरुवात केली. पण अचानक मागून एक डेमो ट्रेन आली. हे पाहून दोन्ही तरुणांनी रुळावरून बाजुला जाण्याचा प्रयत्न केला.
एक तरुण पळून जाण्यात यशस्वी झाला, परंतु दुसरा तरुण ट्रेनला धडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी घंसौर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण एका खासगी कंपनीत काम करत होता. तो नरसिंहपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. एका मित्रासोबत शेताच्या कामासाठी बाहेर गेला होता. त्यानंतर दोघेही वाटेत थांबले आणि रेल्वे ट्रॅकवर रील बनवत होते. याच दरम्यान एक ट्रेन गेली आणि मागून दुसरी ट्रेन आली. रील बनवताना तरुणाने ट्रेनच्या हॉर्नच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला