कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 23:42 IST2025-11-14T23:41:50+5:302025-11-14T23:42:03+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कैमूर जिल्ह्यातील रामगढ विधानसभा मतदारसंघात मोठा गदारोळ झाला.

कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कैमूर जिल्ह्यातील रामगढ विधानसभा मतदारसंघात मोठा गदारोळ झाला. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात ही हिंसक घटना घडली. २४ व्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर बसपा उमेदवार सतीश कुमार सिंह उर्फ पिंटू यादव हे भाजपचे उमेदवार अशोक सिंह यांच्यापेक्षा केवळ १७५ मतांनी आघाडीवर होते. २५ व्या आणि शेवटच्या फेरीच्या निकालाची प्रतीक्षा असताना, बसपा समर्थकांमध्ये आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.
झटापट आणि तोडफोड
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी समर्थकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. याला प्रत्युत्तर म्हणून जमावाने पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. संतप्त जमावाने एका स्कॉर्पिओ गाडीला आग लावून जाळले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वातावरण अजूनही तणावपूर्ण
शेवटच्या फेरीची मतमोजणी बाकी असताना, बसपाचे उमेदवार सतीश यादव यांचे समर्थक जिल्हा प्रशासनाविरोधात मतमोजणी केंद्राबाहेर घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले आहेत. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असल्याने परिसरात मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाकडून लोकांना शांतता राखण्याचे आणि जमाव पांगवण्याचे आवाहन केले जात आहे.
एनडीएचा मोठा विजय
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे, तर नितीश कुमार यांचा जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत महागठबंधनचा अक्षरशः सफाया झाला असून त्यांना ५० जागांचा आकडाही गाठता आलेला नाही.
तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षाला मोठा धक्का बसला असून, तो केवळ २५ जागांवरच थांबला आहे. ज्या सिमांचल भागातून तेजस्वी यादव यांना मोठ्या अपेक्षा होत्या, तिथेही त्यांना अपयश आले आहे. विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश सहनी, जे प्रचार काळात तेजस्वी यादव यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून फिरत होते, त्यांच्या पक्षाला आपले खातेही उघडता आलेले नाही. ६ जागांवर लढूनही त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही.