भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर जम्मू आणि काश्मीरमधील दोडा येथील आम आदमी पक्षाने लोकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित मुद्दा उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना दोडा जिल्ह्यात पीठ, तांदूळ आणि साखर यासारख्या जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात पुरवण्याचं आवाहन केलं आहे.
आम आदमी पक्षाचे आमदार मेहराज मलिक यांनी 'एक्स' वर याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि सतीश शर्मा यांना मोठं आवाहन केलं आहे. "मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की, दोडा जिल्हा आणि विधानसभेत रेशनचा मोठा तुटवडा आहे. विशेषतः दुकानांमध्ये पीठ, तांदूळ आणि साखर उपलब्ध नाही. दुकानांमध्ये या दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध नसल्याने जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे."
"जम्मू आणि काश्मीर सरकारने दुकानांमध्ये पुरेशा प्रमाणात दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या पाहिजेत. आम्ही सर्वजण तयार आहोत पण वेळेवर आवश्यक असलेला अन्न पुरवठा करा" असं मेहराज मलिक यांनी म्हटलं आहे. मेहराज मलिक हे जम्मू आणि काश्मीरच्या दोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी भाजपाच्या गजय सिंह राणा यांचा पराभव केला होता.
मेहराज मलिक हे दोडा जिल्हा विकास परिषदेचे सदस्यही राहिले आहेत. २०२१ मध्ये मेहराज मलिक यांनी डीडीसी निवडणुकीत विजय मिळवला. मलिक यांनी २०१४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. २०२४ मध्ये ते आम आदमी पक्षात सामील झाले आणि दोडा विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले. जम्मू-काश्मीर विधानसभेत ते एकमेव आप आमदार आहेत.