काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार, १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा, 'या' मुद्यांवर रान उठविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:55 IST2024-12-27T11:54:37+5:302024-12-27T11:55:42+5:30
एप्रिलमध्ये काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशन

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार, १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा, 'या' मुद्यांवर रान उठविणार
राम मगदूम/प्रकाश बेळगोजी
बेळगाव : संविधानावरील कथित हल्ला तसेच महागाई आणि भ्रष्टाचाराबद्दल लोकांच्या चिंता यासारखे मुद्दे उपस्थित करून सरकारविरोधात रान उठविण्यासाठी काँग्रेसने गुरुवारी पदयात्रेसह १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा केली. पक्षात मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार असून ही प्रक्रिया लगेच सुरू होईल आणि पुढील वर्षभर चालेल.
काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीच्या म्हणजेच नव सत्याग्रह बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले. त्यातील एक महात्मा गांधींवर आणि दुसरा राजकीय होता. पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते "ऐतिहासिक" बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जयराम रमेश आणि पवन खेरा उपस्थित होते.
के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, २०२५ हे वर्ष संघटनेच्या सुधारणेचे वर्ष असणार आहे. नेतृत्व करण्याची क्षमता आणि उत्तरदायित्व या दोन गुणाच्या आधारावर पक्षात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार आहेत.
जय बापू, जय भीम आणि जय संविधान अभियान
२७ डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत 'जय बापू, जय भीम आणि जय संविधान अभियान' असेल . ते गाव, ब्लॉक, जिल्हा आणि राज्याराज्यांत राबविण्यात येईल. या अभियानाचे नेतृत्व राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व करणार असल्याचेही वेणुगोपाल यांनी सांगितले. संविधानावरील हल्ला, संविधानाच्या मूल्यांचा ऱ्हास, महागाई आणि भ्रष्टाचार यासारखे लोकांचे प्रश्न या अभियानाद्वारे मांडणार आहोत, २६ जानेवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी महु येथे विशाल रॅलीने त्याच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. असेही ते म्हणाले.
एप्रिलमध्ये काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशन
महात्मा गांधीजींच्या विचारांवर पंतप्रधान, गृहमंत्री,भाजप व आरएसएसकडून हल्ले होत आहेत. यामुळे गुजरातमध्ये एप्रिल महिन्यात काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तब्बल चार तास बैठक
या बैठकीला विस्तारित कार्यकारिणीचे देशभरातील १३२ सदस्य उपस्थित होते.त्यापैकी ५० जणांनी चर्चेत भाग घेतला. अध्यक्ष खर्गे व राहुल गांधी यांनी सखोल विवेचन केले.तब्बल चार तास ही बैठक चालली.