अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी मोठी घडामोड; छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 7 नक्षलवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:11 IST2024-12-12T19:11:02+5:302024-12-12T19:11:23+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा 15 डिसेंबरला छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी मोठी घडामोड; छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 7 नक्षलवादी ठार
Naxalite Encounter : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील दक्षिण अबुझमद भागात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झाले. या सर्वांचे मृतदेह सापडले असून, त्यात एका उच्चपदस्थ नक्षलवाद्याचाही समावेश आहे, जो रेड मिलिटंट्सच्या केंद्रीय समितीचा भाग होता. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे तीन वाजल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे.
नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर आणि कोंडागाव जिल्ह्याचे विशेष टास्क फोर्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव रक्षक यांचे संयुक्त पथक दक्षिण अबुझमद भागात नक्षलविरोधी शोध मोहीम राबवत होते. सीआरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
अधूनमधून गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत केंद्रीय समिती स्तरावरील नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी पहाटे 3 वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलविरोधी शोध मोहिमेत मंगळवारी विशेष टास्क फोर्स आणि केंद्रीय राखीव पोलिसासह नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील जिल्हा राखीव रक्षक दक्षिण अबुझमद भागाकडे रवाना झाले होते.
7 नक्षलवादी ठार
एसपी प्रभात कुमार म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 15 डिसेंबरला बस्तरला भेट देणार आहेत. शाह यांच्या बस्तर दौऱ्यापूर्वी सुरक्षा दलांनी अबुझमद भागात 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यांचे मृतदेहही सापडले आहेत. परिसरात शोध मोहीम सुरू आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी याला दुजोरा दिला आहे.