सुप्रीम कोर्टात होत आहेत मोठे बदल; कामकाजाचे व्हिडिओ काढण्याला आक्षेप नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 14:54 IST2022-09-08T14:53:18+5:302022-09-08T14:54:02+5:30
कोर्टाने नुकताच ४ दिवसांत १,२९३ प्रकरणांचा निपटारा करून नवा विक्रम प्रस्थापित केला. कायमस्वरूपी घटनापीठ कार्यरत करण्याची योजना आखली जात आहे.

सुप्रीम कोर्टात होत आहेत मोठे बदल; कामकाजाचे व्हिडिओ काढण्याला आक्षेप नाही
डॉ. खुशालचंद बाहेती -
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत सुप्रीम कोर्टात नवनवीन योजना अमलात येत आहेत. जलद निपटारा, पर्यावरणपूरक सुनावणी होत आहे. इतकेच नव्हे तर कोर्टरूममध्ये कामकाजाचे व्हिडिओ काढण्यालाही आक्षेप घेण्यात आलेला नाही.
कोर्टाने नुकताच ४ दिवसांत १,२९३ प्रकरणांचा निपटारा करून नवा विक्रम प्रस्थापित केला. कायमस्वरूपी घटनापीठ कार्यरत करण्याची योजना आखली जात आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ इतिहासात प्रथमच ‘हरित खंडपीठ’ असेल. हे कोर्टाचे पर्यावरण रक्षण करणारे पाऊल आहे. या खंडपीठासमोर हजर होणाऱ्या वकिलांनी कोणतीही कागदपत्रे आणण्याची गरज नाही.
न्यायमूर्ती चंद्रचूड, एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी.एस. नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने ते पूर्णपणे हरित खंडपीठ असेल, असे ठरवले आहे. त्यांनी वकिलांना न्यायालयाच्या खोलीत कागदपत्रे घेऊन येऊ नये, असे सांगितले आहे.
आयटी सेलचे प्रमुख हे तंत्रज्ञानात निष्णात आहेत, ते शनिवारी वरिष्ठ वकिलांना तंत्रज्ञान कसे वापरावे, याचे प्रशिक्षण देण्यास इच्छुक आहेत, असे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले.
त्यात मोठी गोष्ट काय आहे?
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर मनोरंजक टिप्पणी केली. काल, मी माझ्या कोर्टात कोणीतरी मोबाइल डिव्हाइस वापरताना पाहिले. बहुतेक ते आम्ही काय म्हणत आहोत हे रेकॉर्ड करत होते. जर मी खुल्या कोर्टात काही बोलत असेल आणि कुणाला ते रेकॉर्ड करायचे असेल, तर त्यात मोठी गोष्ट काय आहे? असो!, असे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले.