छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:50 IST2025-11-18T12:31:38+5:302025-11-18T12:50:17+5:30
Madvi Hidma Death News: आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार केला असून, आज सकाळी झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा हा ठार झाला आहे. तर त्याची पत्नीही या चकमकीत मारली गेली आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार
गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर जबर कारवाई करत नक्षली चळवळीचं कंबरडं मोडलं आहे. या कारवायांमध्ये नक्षलवाद्यांचे अनेक मोठे नेते आणि कमांडर मारले गेल्याने नक्षल चळवळ आता अखेरच्या घटका मोजत आहे. दरम्यान, आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार केला असून, आज सकाळी झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा हा ठार झाला आहे. तर त्याची पत्नीही या चकमकीत मारली गेली आहे. हिडमा याच्यावर कोट्यवधी रुपयांचं बक्षीस होतं.
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या नक्षल प्रभावीत भागातील शेजारील राज्यांना लागून असलेल्या सीमेवर मंगळवारी सकाळपासूनच डीआरजीचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दरम्यान, या चकमकीत काही नक्षलवादी मारले गेले आहेत. तसेच चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये माडवी हिडमा आणि त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीमध्ये हिडमा आणि त्याच्या पत्नीसह एकूण सहा नक्षलवादी मारले गेले आहेत.
माडवी हिडमा हा बस्तरमधील नक्षलवाद्यांच्या सर्वात मोठा कमांडर होता. तसेच तो सेंट्रल टीमला सांभाळत होता. त्याच्यावर छत्तीसगडसह इतर राज्यांकडून १ कोटी रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. काही काळापूर्वी सुरक्षा दलांनी कर्रेगुट्टाच्या पर्वतरांगांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली होती तेव्हा माडवी हिडमा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र आता तो सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ठार झाला आहे.
दरम्यान, टॉप नक्षली कमांडर बसवा राजू हा मारला गेल्यानंतर माडवी हिडमा याच्या हातात नक्षलवादाचं नेतृत्व आलं होतं. बसवा राजू याच्या मृत्यूनंतर माडवी हिडमा याला माओवादी संघटनेचा नवा सरचिटणीस बनवण्यात आलं होतं. मात्र सुरक्षा दलांनी आज त्याला कंठस्नान घातले. हिडमा याचा मृत्यू माओवाद्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.