मोठा हल्ला टळला! नक्षलवाद्यांनी पेरलेला 50 किलो IED; सुरक्षा दलांनी केला नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:40 IST2025-01-23T18:39:52+5:302025-01-23T18:40:13+5:30
नक्षलवाद्यांनी एका पुलाखाली 50 किलो स्फोटके पेरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मोठा हल्ला टळला! नक्षलवाद्यांनी पेरलेला 50 किलो IED; सुरक्षा दलांनी केला नष्ट
बिजापूर: हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी मोठा झटका दिला आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी सुमारे 50 किलो इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) नष्ट केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बासागुडा-आवापल्ली रस्त्यावरील पुलाखाली हे 50 किलो आईडी लावण्यात आला होता. यादरम्यान, गस्तीवर निघालेल्या सीआरपीएफच्या पथकाला हे स्पोटके आढळले.
पुलाखाली पेरला आयईडी
सुरक्षा दलाचे पथक तिमापूर दुर्गा मंदिराजवळ असताना त्यांना नक्षलवाद्यांनी पुलाखाली सुमारे 50 किलो आयईडी पेरल्याची माहिती मिळाली. अधिका-यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी पुलाखालील काँक्रीट काढून त्यात हे आयईडी लपवले होते. आयईडी शोधण्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला. अथक प्रयत्नानंतर हा आयईडी निकामी करण्यात आला.
नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले
अधिका-यांनी सांगितले की, मोठ्या वाहनांना उडवण्यासाठी हे 'रिमोट कंट्रोल' आयईडी पेरला होता. मात्र सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. हा भूसुरुंग नष्ट करताना रस्त्यावर खोल खड्डा तयार झाला होता, तो भरून वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे.
6 जानेवारीला झालेला मोठा स्फोट
या महिन्याच्या 6 तारखेला राज्यातील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी भूसुरुंगाचा स्फोट केला होता, ज्यात 8 सुरक्षा कर्मचारी आणि वाहन चालकासह नऊ जणांना जीव गमवावा लागला. ही घटना घडवण्यासाठी माओवाद्यांनी सुमारे 70 किलो वजनाचा आयईडी वापरला होता.