अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 22:53 IST2025-11-18T22:52:47+5:302025-11-18T22:53:42+5:30
ईडीने दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या आधारे तपास सुरू केला होता.

अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये मोठी कारवाई करत अल-फलाह समूहाचे आणि विद्यापीठाचे संस्थापक जावेद अहमद सिद्दीकी यांना मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत अटक केली आहे. फरिदाबादस्थित या शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना फसविण्यासाठी खोटी माहिती देणे आणि कोट्यवधींचा निधी कुटुंबातील संस्थांकडे वळवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
ईडीने दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या आधारे तपास सुरू केला होता. या तपासामध्ये गंभीर अनियमितता उघड झाल्या आहेत. अल-फलाह विद्यापीठाने NAAC मान्यता आणि UGC कायद्याच्या कलम १२ (B) अंतर्गत (सरकारी अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक) मान्यता मिळाल्याचे खोटे दावे केले. यामुळे विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करून अवैध कमाई करण्यात आली.
अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टकडून कोट्यवधींचा निधी सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्यांकडे वळवण्यात आला. बांधकाम आणि केटरिंगचे कंत्राटही त्यांची पत्नी आणि मुलांच्या फर्म्सना देण्यात आले होते. ईडीने विद्यापीठ आणि प्रमुख व्यक्तींच्या निवासस्थानासह दिल्ली-एनसीआरमधील १९ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ₹४८ लाखांहून अधिक रोख रक्कम, अनेक डिजिटल उपकरणे आणि महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.
दिल्ली स्फोटाशी जोडले गेलेले कनेक्शन
या कारवाईला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण अल-फलाह विद्यापीठातील काही प्राध्यापक आणि डॉक्टरांचे नाव दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील कार स्फोट प्रकरणातील संशयितांशी जोडले गेले आहे. त्यामुळे, सिद्दीकी यांच्यावरील कारवाईला दहशतवाद आणि वित्तीय अनियमितता या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.