दिल्लीतील दर्यागंज परिसरातील सद्भावना पार्कजवळ बुधवारी इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतदेह लोकनायक रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. डीडीएमएसह नागरी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे आणि बचावकार्य सुरू आहे. या प्रकरणातील दोषींविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२.१४ वाजताच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या घटनेत तीन जणांना मृत्यू झाला आहे. तर, तीन जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत झालेले नुकसान आणि जखमी झालेल्या लोकांचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
याआधी १२ जुलै रोजी दिल्लीच्या वेलकम परिसरात एक अनधिकृत चार मजली निवासी इमारत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर, आठ जण जखमी झाले. शिवाय, या घटनेत बाजुच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या घटनेला महिना उलटला नाही तोच, आणखी एक इमारत कोसळल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.