कर्नाटकातील हासन जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. होलेनरसीपुरा येथील मोसले होसहल्लीजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीत एक मोठा मालवाहू ट्रक शिरला. एनएच-373 वर झालेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच, तर 3 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अशा एकूण ८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून पुलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी असलेले 8 जण रुग्णालयात दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवत चौकशी सुरू केली आहे. दुर्घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एचडी कुमारस्वामींनी व्यक्त केला शोक -केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या अपघातासंदर्भात शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'हासन तालुक्यातील मोसालेहोसाहल्ली येथे गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघाताचे वृत्त ऐकूण मोठा धक्का बसला. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका ट्रक अपघातात भाविकांचा मृत्यू झाला, हे अत्यंत दुःखद आहे.
देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. मी सर्व जखमी लवकरात लवकर बरे होवोत, यासाठी प्रार्थना करतो. जखमींना योग्य मोफत उपचार देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत," असेही एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.