Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात गुरुवारी(6 मार्च 2025) संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. कोळसा खाणीचा स्लॅब कोसळून अनेक कामगार दबले गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले असून, ढिगाऱ्याखालून तीन मजुरांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र डॉक्टरांच्या पथकाने त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बैतूल जिल्ह्यातील सारणी येथील बागडोना-छतरपूर खाणीत गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला. खाणीचे छत कोसळल्याने अनेक कामगार दबले गेले, तर तीन कामगारांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ.योगेश पंडागरे, जिल्हाधिकारी नरेंद्रकुमार सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक (एसपी) निश्चल झरिया यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्या सूचनेवरून तातडीने बचाव मोहीम सुरू करण्यात आली. खाणीत काम करणाऱ्या इतर मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, एसपी निश्चल झरिया यांनी तीन मजुरांच्या मृत्यूला दुजोरा दिला. या अपघातात गोविंद कोसारिया (37) शिफ्ट इन्चार्ज, हरी चौहान (46) आणि रामदेव पंडोळे (49) यांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना ग्रॅशिया, ग्रॅच्युइटी, नुकसानभरपाई, पीएफ आणि लाइफ कॅशमेंटची रक्कम लवकरच जारी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या घटनेनंतर प्रशासनाने खाण सुरक्षा मानकांचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील. सध्या बचावकार्य पूर्ण झाले असून, अपघाताच्या कारणाचा सविस्तर तपास अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.