केदारनाथ यात्रा सुरु होण्यापूर्वी मोठी दुर्घटना; हेलिकॉप्टरच्या पंख्याला धडकून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 15:57 IST2023-04-23T15:57:12+5:302023-04-23T15:57:37+5:30
केदारनाथ यात्रा सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत. यावेळी घटनास्थळी उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचे सीईओदेखील होते.

केदारनाथ यात्रा सुरु होण्यापूर्वी मोठी दुर्घटना; हेलिकॉप्टरच्या पंख्याला धडकून एकाचा मृत्यू
केदारनाथ यात्रा सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत. यातच उत्तराखंडच्या एका अधिकाऱ्याचा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत अधिकाऱ्याचे नाव अमित सैनी असल्याचे सांगितले जात आहे. ते सिव्हिल एव्हिएशनमध्ये फायनान्शिअल कंट्रोलर होते.
सुत्रांनुसार हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी सैनी हेलिकॉप्टरकडे जात होते. यावेळी घटनास्थळी उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचे सीईओदेखील होते. सैनी हेलिकॉप्टरकडे जात असताना मागल्या टेल रोटर पंख्याला आदळले आणि त्यांची मान कापली गेली. यामुळे सैनी यांचा जागीच मृत्यू झाला.
केदारनाथ यात्रा २५ एप्रिलपासून सुरु होत असल्याने हेलिकॉप्टरची चाचणी सुरु होती. यावेळी हा अपघात झाला आहे. बाबा केदारनाथचे दरवाजे 25 एप्रिलपासून उघडणार आहेत, त्यासाठी प्रशासन स्तरावर जोरदार तयारी सुरू आहे. यासोबतच केदारनाथ मंदिराच्या सुशोभिकरणासाठीही मंदिर समिती कार्यरत आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी हेली सेवाही धामवर पोहोचली आहे. केदारनाथ धामसाठी डीजीसीएने यावेळी नऊ हेली सेवांना परवानगी दिली आहे.
या नऊ हेलीकॉप्टर सेवा गुप्तकाशी, फाटा आणि शेरसी येथून उड्डाण करणार आहेत. यात्रेकरू फक्त IRCTC वेबसाइट http://heliyatra.irctc.co.in वर तिकीट बुक करू शकणार आहेत.