"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:49 IST2025-12-17T18:22:57+5:302025-12-17T19:49:19+5:30
Lokmat National Conclave 2025: सर्वोच्च न्यायालयात झालेल्या बूट फेक प्रकरणावर बोलताना माजी सरन्यायाधीशांनी न्यायसंस्थेवर आजही सामान्यांना विश्वास असल्याचे म्हटले.

"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
Lokmat National Conclave 2025: काही महिन्यांपूर्वी देशाचे माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सदर वकिलावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत होती. मात्र वकिलावर कुठलीही कारवाई न करण्यास माजी बी.आर. गवई यांनी सांगितले होते. लोकमत समूहातर्फे दिल्लीत आयोजित पाचव्या नॅशनल कॉन्कक्लेव्हमध्ये संवैधानिक संस्थांपुढील आव्हाने या चर्चासत्रात बोलताना बी.आर. गवई यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी विचारलेल्या प्रश्नावर माजी सरन्यायाधीशांनी भाष्य केले. बुटफेक प्रकरणात न्यायालयाचा अवमान झालेला असताना तुम्ही त्यांना माफ केल्याचे कुरेशी म्हणाले. यावरुन बोलताना माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यात कायद्याचा मोठेपणा असल्याचे म्हटले.
"मला नेहमीच वाटते की, कायद्याचे मोठेपण हे कोणाला तरी शिक्षा देण्यापेक्षा त्याला माफ करण्यात आहे. माझ्या २४ वर्षांहून अधिक काळाच्या न्यायालयीन कारकिर्दीत मी क्वचितचएखाद्या व्यक्तीला न्यायालयीन अवमानप्रकरणी तुरुंगवास किंवा कठोर शिक्षा सुनावली असेल. सध्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अवमान याचिकेवर अधिक बोलणे अयोग्य ठरेल. सध्या हे प्रकरण न्यायालयासमोर प्रलंबित आहे, त्यामुळे त्यावर आता भाष्य करणे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही,"
यावेळी न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी न्यायव्यवस्थेवरील लोकांच्या विश्वासाबाबत अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वाचे विधान केले. त्यांच्या मते, सामान्य जनतेचा न्यायसंस्थेवर असलेला विश्वास आजही कमी झालेला नाही.
"सामान्य जनतेचा न्यायसंस्थेवर असलेला विश्वास आजही कमी झालेला नाही. जेव्हा लोकांवर अन्याय होतो किंवा त्यांचे शोषण होते, तेव्हा ते आजही न्यायव्यवस्थेकडे शेवटचा आधार म्हणून पाहतात. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा माणूस न्यायासाठी कोर्टाकडेच धाव घेतो, हेच लोकांच्या विश्वासाचे सर्वात मोठे लक्षण आहे. लोक जेव्हा स्वतःला पीडित किंवा अन्यायग्रस्त समजतात, तेव्हा त्यांच्या मनात पहिली भावना हीच असते की, आम्हाला न्यायपालिकेकडून न्याय मिळेल. हा विश्वास हीच भारतीय न्यायव्यवस्थेची मोठी ताकद आहे," असेही बी. आर. गवई म्हणाले.
नेमकं काय घडलं?
भारताच्या न्यायालयीन इतिहासात ६ ऑक्टोबर २०२५ रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि अभूतपूर्व घटना घडली. सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट रूममध्ये सुनावणी सुरू असताना ७१ वर्षीय ज्येष्ठ वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. भगवान विष्णूच्या मूर्तीबाबतच्या एका याचिकेवर भाष्य करताना सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली होती. या विधानामुळे राकेश किशोर हे संतापले होते आणि त्यातूनच त्यांनी हे कृत्य केले.
माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा संयम
या धक्कादायक प्रसंगानंतरही सरन्यायाधीश गवई यांनी कमालीचा संयम दाखवला होता. त्यांनी कामकाज न थांबवता वकिलांना सांगितले की, "मी या गोष्टींमुळे विचलित होणारा शेवटचा व्यक्ती असेन." त्यांनी सुरक्षारक्षकांनाही सांगितले की, या घटनेला फार महत्त्व न देता संबंधित वकिलाला सोडून द्यावे.