Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:17 IST2025-10-15T18:16:32+5:302025-10-15T18:17:26+5:30
Maithili Thakur Bihar Assembly Constituency: मैथिली ठाकूर विधानसभा निवडणूक लढवणार यावर भाजपकडून अखेर शिक्कामोर्तब झाला. भाजपची दुसरी यादी जाहीर झाली असून, यात मैथिली ठाकूर यांच्या नावाचाही समावेश आहे.

Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
Maithili Thakur Constituency: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत १२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत मैथिली ठाकूर यांच्या नावाचाही समावेश आहे. मैथिली ठाकूर या दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहे. भाजपने बक्सर विधानसभा मतदारसंघातून आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने पहिल्या यादीत ७१ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत १२ उमेदवार असून, मैथिली ठाकूर यांच्या पक्षप्रवेशानंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुजफ्फरपूर विधानसभा मतदारसंघातून रंजन कुमार यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश शर्मा हे उमेदवार असायचे, पण यावेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. आयपीएस आनंद मिश्रा हे बक्सर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत.
मैथिली ठाकूरने मंगळवारी (१४ ऑक्टोबर) पाटणा येथे भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप प्रवेशानंतर मैथिली ठाकूर यांच्या निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मैथिली ठाकूर यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
कोणाचे तिकीट कापले?
भाजपने कुसुम देवी यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या गोपालगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपने सुभाष सिंह यांना उमेदवारी दिली आहे. याचबरोबर बाढ विधानसभा मतदारसंघातून भाजपने ज्ञानेंद्र सिंह यांचे तिकीट कापले असून, सियाराम सिंह यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मुजफ्फरपूर विधानसभा मतदारसंघातून सुरेश शर्मा यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. रंजन कुमार यांना संधी देण्यात आली आहे.