Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:36 IST2025-10-16T17:34:39+5:302025-10-16T17:36:53+5:30
Maithili Thakur Bihar Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली. त्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत, पण त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपमधूनच विरोध होतोय.

Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
Alingagar Assembly election 2025: भाजपने गायिका मैथिली ठाकूर यांचे पक्षात स्वागत केले आणि दुसऱ्याच दिवशी उमेदवारीही जाहीर करून टाकली. मैथिली ठाकूर या बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात असलेल्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. पण, दुसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाले आणि अलीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते संतापले. सोशल मीडियावरून मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला विरोध सुरू झाला. आणि विरोधाचे कारणही समोर आले.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूर यांची अचानक एन्ट्री झाली. पक्षाने त्यांना थेट उमेदवारी दिल्याने अनेकांना धक्काही बसला.
बाहेरचा उमेदवार लादला, सात मंडळ अध्यक्ष नाराज
अलीनगर विधानसभा मतदारसंघातील सात मंडळ अध्यक्षांनी मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. मतदारसंघातील प्रत्येक बूथ मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमिनीवर काम करत आहेत. मैथिली ठाकूर यांना उमेदवारी देताना त्यांचे मत विचारात घेतले गेले नाही.
तारडीह पूर्वचे मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम झा, तारडीह पश्चिमचे मंडळ अध्यक्ष पंकज कंठ, घनश्यामपूर पूर्वचे मंडळ अध्यक्ष सुधीर सिंह, घनश्यामपूर पश्चिमचे मंडळ अध्यक्ष चंदन कुमार, शहर मंडळ अध्यक्ष रणजीत कुमार मिश्रा, अलीनगर पश्चिमचे मंडळ अध्यक्ष गंगा प्रसाद यादव, अलीनगर पूर्वचे मंडळ अध्यक्ष लाल मैथिली यांनी मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
विरोध करत असलेल्या सातही मंडळ अध्यक्षांनी भाजपच्याच संजय सिंह उर्फ पप्पू सिंह यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
अलीनगर विधानसभा मतदारसंघातून २०२० मध्ये व्हीआयपी पक्षाच्या तिकिटावर मिश्री लाल यादव यांनी निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झाले होते. राष्ट्रीय जनता दलाचे विनोद मिश्रा यांचा ३ हजार १०१ मतांनी त्यांनी पराभव केला होता. संजय सिंह उर्फ पप्पू सिंह यांनी जन अधिकार पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना ९ हजार ७३७ मते मिळाली होती.