माहेरी गेलीस तर टॉवरवरून उडी मारेन, पत्नीसोबतच्या भांडणानंतर पतीचा शोलेस्टाइल ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 19:11 IST2020-11-30T19:07:25+5:302020-11-30T19:11:18+5:30
Madhya Pradesh News : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर पतीने उच्च विद्युतप्रवाह असलेल्या टॉवरवर चढून शोलेस्टाइल ड्रामा सुरू केला.

माहेरी गेलीस तर टॉवरवरून उडी मारेन, पत्नीसोबतच्या भांडणानंतर पतीचा शोलेस्टाइल ड्रामा
भोपाळ - पती-पत्नींमध्ये भांडणे मतभेद होणं ही सर्वसामान्य बाब आहे. मात्र मध्य प्रदेशमधील एका नवऱ्याने पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर अजब धमकी दिल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या बडवानी येथे पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर पतीने उच्च विद्युतप्रवाह असलेल्या टॉवरवर चढून शोलेस्टाइल ड्रामा सुरू केला. सुमारे तासभर चाललेल्या थरारनाट्यानंतर पोलिसांनी या पतीची समजूत काढून त्याला खाली उतरवले.
पत्नीशी भांडण झाल्यानंतर हा पती उच्चविद्युत प्रवाह असलेल्या टॉवरवर चढला. मात् सुदैवाने त्यावेळी वीजप्रवाह सुरू नव्हता. मात्र हा ड्रामा पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. टॉवरवर सुमारे ८० फूट उंचावर चढलेला पती माहेरी गेलीस तर खाली उडी मारेन, असे पत्नीला सातत्याने सांगत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतरही सुमारे तासभर हा ड्रामा सुरू होता. अखेरीस पोलिसांनी या पतीची समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात यश मिळवले.
या तरुणाला सातत्याने खाली उतरण्यास सांगण्यात येत होते. मात्र तो पत्नी माहेरी गेली तर खाली उडी मारेन असे तो सातत्याने सांगत होता. दरम्यान, पतीच्या या ड्राम्याची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तीसुद्धा घटनास्थळी पोहोचली. तसेच पोलीसही हजर झाले. त्यानंतर या पराक्रमी पतीला खाली उतरवण्याची मोहीम सुरू झाली. अखेरीस बराचवेळ समजावल्यानंतर तो खाली उतरला. या तरुणाचा कुठल्यातरी कारणावरून पत्नीशी वाद झाला होता. त्यानंतर पत्नीने माहेरी जाण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पतीने टॉवरवर चढून हा ड्रामा सुरू केला होता.