भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधींचा वारसा धोक्यात; सोनिया गांधींचे CWC ला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:28 IST2024-12-26T19:27:53+5:302024-12-26T19:28:47+5:30
बेळगावमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत असून, बैठकीपूर्वी सोनिया गांधींनी पक्षाला उद्देशून पत्र लिहिले आहे.

भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधींचा वारसा धोक्यात; सोनिया गांधींचे CWC ला पत्र
Congress Meeting : आज बेळगावमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह सर्व पक्षाचे सर्व प्रमुख नेते पोहोचले आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या बैठकीसाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीला एक पत्र लिहिले आहे.
सोनिया गांधी यांनी पक्षाला लिहिलेल्या पत्रात भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधींचा वारसा धोक्यात असल्याचा दावा केला आहे. सोनिया गांधी आपल्या पत्रात म्हणतात, 'देशात वेगवेगळ्या ठिकाणी गांधीवादी संस्थांवर हल्ले होत आहेत. या संघटनांनी कधीच स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला नाही, उलट महात्मा गांधींना कडाडून विरोध केला. या संघटनांनी असे विषारी वातावरण निर्माण केले, ज्यामुळे महात्मा गांधींच्या हत्येचा मार्ग मोकळा झाला. हे लोक महात्मा गांधींच्या खुन्यांचा गौरव करतात,' अशी घणाघाती टीका त्यांनी भाजपवर केली.
"Mahatma Gandhi's legacy is under threat from those in power in Delhi" pic.twitter.com/kV3fK2caaN
— Congress (@INCIndia) December 26, 2024
सोनिया गांधी पुढे म्हणथात, 'काँग्रेसच्या या बैठकीला नव सत्याग्रह सभा म्हणणे वावगे ठरणार नाही. आता पूर्ण ताकदीने आणि दृढनिश्चयाने या शक्तींचा मुकाबला करावा लागेल. आपली संघटना मजबूत करण्याचा प्रश्नही आज निर्माण झाला आहे. आपल्या संघटनेचा इतिहास इतका गौरवशाली आहे की, पक्षाने वेळोवेळी हे दाखवून दिले आहे. या बैठकीद्वारे आपण वैयक्तिक आणि सामूहिकपणे पुढे जाऊया आणि आपल्या पक्षासमोरील आव्हानांना नव्याने तोंड देऊ. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.'
"Today, we rededicate ourselves to preserve, protect and promote the legacy of Mahatma Gandhi." pic.twitter.com/sAXXGTz9ZL
— Congress (@INCIndia) December 26, 2024
याच ठिकाणी काँग्रेसचे 39 वे अधिवेशन झाले
'मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनो, या ऐतिहासिक सोहळ्याला मी तुम्हा सर्वांसोबत उपस्थित राहू शकत नाही, याचे मला दु:ख आहे. बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 39वे अधिवेशन झाले होते. महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनणे, हा आमच्या पक्षासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. आपल्या देशाच्या इतिहासातील हा एक परिवर्तनाचा टप्पा होता. आज आपण महात्मा गांधींच्या वारशाचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्वतःला समर्पित करतो. ते आपले प्रमुख प्रेरणास्रोत होते आणि राहतील. त्यांचा वारसा भाजप सरकार आणि त्यांचे पालनपोषण करणाऱ्या विचारधारा आणि संस्थांकडून धोक्यात आला आहे', असेही त्या यावेळी म्हणाल्या.