महात्मा गांधीजी यांच्या ग्रामस्वराज्यासाठी लोकस्वराज्य पदयात्रा; बेळगावहून प्रस्थान; ३० जानेवारीला हुबळीत सांगता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:24 IST2024-12-30T12:24:25+5:302024-12-30T12:24:35+5:30
राम मगदूम गडहिंग्लज : देशात धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी हिंदूराष्ट्र निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. बहुपक्षीय लोकशाहीऐवजी एकपक्षीय (भाजप) सरकारमुळे संविधानाला धोका ...

महात्मा गांधीजी यांच्या ग्रामस्वराज्यासाठी लोकस्वराज्य पदयात्रा; बेळगावहून प्रस्थान; ३० जानेवारीला हुबळीत सांगता
राम मगदूम
गडहिंग्लज : देशात धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी हिंदूराष्ट्र निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. बहुपक्षीय लोकशाहीऐवजी एकपक्षीय (भाजप) सरकारमुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे. संमिश्र अर्थव्यवस्थेऐवजी सगळी अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या हातात दिली जात आहे. त्यामुळे देशासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले असून, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. परंतु, गांधीजींच्या विचारानेच त्यावर मात करता येईल, अशी आमची भूमिका आहे. किंबहुना, गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य निर्मितीसाठीच लोकस्वराज्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी ‘लोकमत’ला दिली.
महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गोगादे येथील विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानतर्फे काँग्रेसच्या सहकार्याने ही पदयात्रा काढण्यात येत आहे. बेळगाव येथील ऐतिहासिक वीर सौध-पंपसरोवरपासून पदयात्रेला सुरुवात झाली असून, ३० जानेवारीला हुबळीत पदयात्रेची सांगता होणार आहे.
दिवाण म्हणाले, महात्मा फुले यांनी शिक्षण सर्वांना मुक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘चवदार’ तळ्याच्या सत्याग्रहातून पाणी खुले केले. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहातून लोकांना नैसर्गिक संपत्तीवरील अधिकार दिला. विनोबाजींनी भूदान चळवळीतून भूमिहीनांना जमीन मिळवून दिली.
महागड्या शिक्षणामुळे आज बहुजनांना पुन्हा ज्ञानापासून वंचित ठेवले जात आहे. पाण्याला विक्रीची वस्तू बनविल्यामुळे जनता पाण्याला महाग झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवरील भूमिपुत्रांचा अधिकार काढून घेऊन अधिवासी, भटके-विमुक्तांना विस्थापित केले जात आहे.
विकास प्रकल्पाच्या नावाखाली सरकार आणि भांडवलदार जमिनी हिसकावून घेत आहेत. किंबहुना, चेहरा बदलून वर्णव्यवस्थाच येत असून, पुन्हा ‘मनुस्मृती’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंडित नेहरू यांनी बहुपक्षीय लोकशाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, संमिश्र अर्थव्यवस्था व अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण या मजबूत पायावर देशाची उभारणी केली. त्यांच्या विचारांनाच सुरुंग लावला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
५०० किलोमीटर, ३४ दिवस..!
१९५८ मध्ये विनोबाजींनी बेळगावपासून भूदान पदयात्रा काढून हुबळीत मुक्काम केला होता. त्याच मार्गाने सुमारे ५०० किलोमीटरची ३४ दिवसांची ही पदयात्रा काढण्यात येत आहे. देशभरातील काँग्रेस व सर्वोदयी कार्यकर्ते आणि गांधीप्रेमी नागरिक पदयात्रेत सहभागी होणार आहेत, असे समन्वयक किरणभाई मुगबसव (हुबळी) यांनी सांगितले.