महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 05:39 IST2025-12-10T05:37:21+5:302025-12-10T05:39:39+5:30
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, अतिवृष्टी, पूर आदी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार पुरेशी मदत करणार आहे. त्यासाठी राज्याला आवश्यक ती रक्कम केंद्राने उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही
नवी दिल्ली : महाराष्ट्रात पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, शेतीच्या नुकसानाची पाहणी करून त्या आधारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, अतिवृष्टी, पूर आदी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार पुरेशी मदत करणार आहे. त्यासाठी राज्याला आवश्यक ती रक्कम केंद्राने उपलब्ध करून दिली आहे.
चौहान म्हणाले की, नुकसानाचे मूल्यांकन करताना ‘क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट’ केले जाईल किंवा राज्याने हवामान आधारित पीक विमा योजना स्वीकारली असल्यास तिच्या निकषांनुसार नुकसानीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा केली जाईल.
मी स्वतःही महाराष्ट्राला जाऊन आलो आहे. पिकांचे जितके नुकसान झाले आहे, त्याचा आढावा घेऊन त्याच्या आधारे केंद्र सरकार पीक विमा योजनेतून रक्कम देईल, तसेच एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) अंतर्गत देखील आम्ही महाराष्ट्राला निधी देणार आहोत.
यासंदर्भातील महाराष्ट्र सरकारने पाठविलेल्या अहवालाच्या आधारे राज्याला मदत दिली जाईल. यासंदर्भात लोकसभेत शिंदेसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी प्रश्न विचारला होता.