सोशल मीडियाचे जसे तोटे आहेत, तसे अनेक फायदेही आहेत. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील कोचस ब्लॉकमधील बलथरी गावातील रहिवासी लाखपातो देवी महाकुंभात पवित्र स्नानासाठी गेल्या होत्या. पण त्या तिथे हरवल्या. अखेर सोशल मीडियाच्या मदतीने लाखपातो देवी आपल्या घरी परत आल्या आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी लाखपातो देवी आपल्या कुटुंबासह महाकुंभ स्नानासाठी गेल्या होत्या, परंतु तिथे प्रचंड गर्दी असल्याने त्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्या. कुटुंबाने दोन दिवस त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आलं नाही. अखेर १५ दिवसांनी झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील बहियारपूर खुर्द पंचायतीत त्याच्याबद्दलची माहिती मिळाली. पंचायत प्रमुख सोनी देवी यांच्या प्रयत्नांमुळे महिलेला सुखरूप तिच्या कुटुंबाकडे परत पाठवण्यात आलं आहे.
बहियारपूर खुर्द पंचायत प्रमुख सोनी देवी यांचे पती वीरेंद्र बैठा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एके दिवशी एक ६० वर्षांची महिला त्यांच्या घरी आली आणि काहीतरी बोलू लागली. या महिलेला पत्नीने जेवण दिलं आणि तिच्या राहण्याची व्यवस्था केली. यानंतर ओळखीच्या, पंचायत प्रमुख अंजनी सिंहशी संपर्क साधला आणि महिलेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
सोशल मीडियाने आई आणि मुलाला आणलं जवळ
जेव्हा लाखपातो देवीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मुलगा राहुल कुमारने तो पाहिला. तो ताबडतोब झारखंडमधील गढवा येथे गेला, त्याच्या आईला ओळखलं आणि तिला घरी परत आणलं. राहुलने सांगितलं की त्याच्या आईला गढवा येथील विष्णू देव पासवान यांच्या घरी आसरा मिळाला, जिथे तिला प्रेम मिळालं आणि तिची काळजी घेतली.
महाकुंभात नातेवाईक दोन दिवस घेत होते शोध
राहुल कुमार म्हणाला की, त्याची आई २४ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात हरवली होती, त्यानंतर कुटुंबाने दोन दिवस तिला शोधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याला यश मिळाले नाही तेव्हा त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आणि शेवटी तो गावी परतला.
सोशल मीडियाचे आभार
१० मार्च रोजी जेव्हा आईचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा राहुलला माहिती मिळाली. भावनिक होत राहुल म्हणाला की, सोशल मीडियामुळे मला माझी आई पुन्हा भेटली. या घटनेने हे सिद्ध केलं की आजच्या डिजिटल युगात जर सोशल मीडियाचा योग्यरित्या वापर केला तर दूर गेलेल्या लोकांना पुन्हा जोडण्याची संधी मिळेल.