महाकुंभ बनला मृत्युकुंभ,मृतांचे आकडे लपविले; प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 06:52 IST2025-02-19T06:52:29+5:302025-02-19T06:52:57+5:30
बांगलादेशमधील दहशतवाद्यांशी तृणमूल काँग्रेस नेत्यांचे संबंध असल्याचा भाजपने केलेला आरोप कोणी सिद्ध केला तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

महाकुंभ बनला मृत्युकुंभ,मृतांचे आकडे लपविले; प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टीका
कोलकाता : महाकुंभ हा मृत्युकुंभ बनला असल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी राज्य विधानसभेत केली. त्या म्हणाल्या की, महाकुंभात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या असून, त्यातील मृतांची खरी संख्या उत्तर प्रदेश सरकार लपवत आहे. प्रयागराजमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३० लोकांचा मृत्यू आणि ६० जण जखमी झाले होते.
बांगलादेशमधील दहशतवाद्यांशी तृणमूल काँग्रेस नेत्यांचे संबंध असल्याचा भाजपने केलेला आरोप कोणी सिद्ध केला तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. भाजप धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. परंतु, माझा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. अवैध स्थलांतर केल्याप्रकरणी अमेरिकेतून भारतात पाठविलेल्या लोकांच्या हाता-पायात बेड्या घालणे, हे अमानूष व लाजिरवाणे असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली. (वृत्तसंस्था)
भाविकांच्या वाहनांच्या तीन अपघातांत आठ ठार
इंदूर : प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या तीन वाहनांना राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये अपघात होण्याच्या तीन घटना घडल्या. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले.
चेंगराचेंगरीप्रकरणी उत्तर प्रदेश विधानसभेत गदारोळ
कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची खरी आकडेवारी जाहीर करा, अशा घोषणा देत उत्तर प्रदेश विधानसभेत राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी मंगळवारी गदारोळ माजविला.
महाकुंभ मेळ्यात ५५ कोटी लोकांचे पवित्र स्नान
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत ५५ कोटी लोकांनी पवित्र स्नान केल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी केला.
त्याच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आल्याच्या अफवा सध्या पसरविण्यात आल्या आहेत. त्याकडे लक्ष देऊ नये, असे प्रयागराजमधील प्रशासनाने म्हटले आहे.