आपल्या माणसांचा शोध! आई बेपत्ता तर कोणी पत्नी गमावली...; चेंगराचेंगरीनंतर कुटुंबीयांचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 18:04 IST2025-01-30T18:03:36+5:302025-01-30T18:04:00+5:30
मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे चेंगराचेंगरीनंतर अनेक लोक बेपत्ता आहेत.

आपल्या माणसांचा शोध! आई बेपत्ता तर कोणी पत्नी गमावली...; चेंगराचेंगरीनंतर कुटुंबीयांचा टाहो
प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे चेंगराचेंगरीनंतर अनेक लोक बेपत्ता आहेत. नातेवाईक आपल्या माणसांचा शोध घेण्यासाठी एका रुग्णालयापासून दुसऱ्या रुग्णालयात भटकत आहेत. यामध्ये अनेकांनी आपली पत्नी, मुलगी, पती, सासू, काका असे कुटुंबातील सदस्य गमावले आहेत.
आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या शोधात प्रयागराजमधील मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलेल्या बिहारमधील सासाराम येथील रहिवासी द्वारिका सिंह यांनी सांगितलं की, ते त्यांच्या पत्नी आणि दोन मेहुण्यांसह मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी कुंभमेळ्याला आले होते. मध्यरात्रीनंतर अचानक चेंगराचेंगरी झाली आणि पत्नीसह सर्वजण वेगळे झाले. द्वारिका सिंह यांनी चेंगराचेंगरीची घटना सांगितली. तसेच ते आपल्या प्रियजनांच्या शोधात एका हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कसे भटकत होते हे देखील सांगितलं.
रोहतास (बिहार) येथील रहिवासी दीपक कुमारची आई देखील स्नान करण्यासाठी आली होती आणि आता ती बेपत्ता झाली. तिचा ठावठिकाणा अद्याप कळलेला नाही. दुसरीकडे दीपक त्याच्या आईला शोधत घरोघरी फिरत आहे, मोबाईलवर तिचा फोटो दाखवत आहे.
मनोज कुमार यांचे भाऊ आणि मेहुणी, जे बिहारचे रहिवासी आहेत, ते देखील मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानासाठी आले होते आणि अद्याप घरी परतलेले नाहीत. मनोज कुमार त्यांच्या शोधात प्रयागराजला पोहोचले. रुग्णालयात ते त्यांचा शोध घेत आहे.
"मी ओरडत होते मला वाचवा..."; महाकुंभ चेंगराचेंगरीत आई, आजीचा मृत्यू, डोळे पाणावणारी घटना
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील दोन महिलांचाही मृत्यू झाला. ज्यांचे कुटुंबीय अजूनही मृतदेह मिळण्याची वाट पाहत आहेत. जौनपूर येथील रहिवासी जगवंती देवी आपल्या कुटुंबासह मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी आल्या होत्या. पण या चेंगराचेंगरीत जगवंती देवींनी त्यांची वहिनी आणि आई गमावली.
जगवंती देवी म्हणाल्या की, जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा आमच्या वहिनी म्हणाल्या - माझ्या मुलीला वाचवा. कोणीतरी माझ्या ७ वर्षांच्या भाचीला बाहेर फेकून दिलं आणि ती बांबूच्या बॅरिकेडला धरून बराच वेळ त्यावर लटकून राहिली. तेव्हाच तिचा जीव वाचला. पण आमच्या वहिनी आणि आईला वाचवता आलं नाही.
भाची म्हणाली, "मीही ओरडत होते मला वाचवा... मला वाचवा... पण कोणीही मला वाचवत नव्हतं."