Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाची जगभरात चर्चा सुरू आहे. देशातील कानाकोपऱ्यातून शेकडो साधू-संतांसह देश-विदेशातून लाखो भाविक कुंभमेळ्यात आले आहेत. यंदाच्या कुंभमेळ्यात एका खास शंखाची सध्या चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही आतापर्यंत विविध प्रकारचे शंख पाहिले असतील. शंखाच्या आवाजाने मन प्रसन्न होते. शंखाच्या आवाजाने नकारात्मक शक्ती दूर होतात, असे मानले जाते. साधारतः 400-500 रुपयांना शंख मिळतो. यंदाच्या कुंभमेळ्यात चक्क 6 लाख रुपये किमतीचा शंख आला आहे.
महाराष्ट्रातील नाशिकहून आलेल्या इंद्रा पवार यांनी महाकुंभमेळ्यात शंखाचे दुकान टाकले आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारचे शंख आहेत, त्यांच्या किमतीदेखील भिन्न आहेत. पण, त्यांच्याकडे सुमारे दोन फूट लांब आणि 10 इंच गोल शंख आहे, ज्याची किंमत तब्बल 6 लाख रुपये आहे. पवार यांच्या दुकानासमोरुन जाताना अनेकजण हा शंख पाहून थांबतात, पण किंमत ऐकून त्यांना धक्का बसतो.
तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, शंख एवढा महाग का आहे, त्यात नेमकी काय खासियत असावी? तर, दुकानदार इंद्र पवार यांनी सांगितले की, ते उज्जैनहून हा शंख विक्रीसाठी घेऊन आले आहेत. असे म्हटले जाते की, हा विष्णू शंख आहे. याचा लक्ष्मी पूजनात वापर केल्याने धनप्राप्ती होते. हा शंख गुजरातमधील जामनगर येथील बेट द्वारिका नावाच्या ठिकाणी समुद्रात सापडतो. या शंखाद्वारे मंदिरांमध्ये जल अर्पण केले जाते. समुद्रात या प्रकारचा शंख मिळणे खूप दुर्मिळ आहे. दरम्यान, कुंभमेळ्यात अनेक श्रीमंत लोकही आले आहेत, त्यांच्यापैकी कुणीतरी हा शंख विकत घेईल, अशी इंद्रा पवार यांना आशा आहे.