उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वंदना कसरेकर यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 19:39 IST2020-12-13T19:38:18+5:302020-12-13T19:39:02+5:30

Justice Vandana Kasrekar : कोरोनाची लागण झाल्यानंतर न्यायाधीश वंदना कसरेकर यांना इंदूरमधील मेंदाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

madhya pradesh indore justice vandana kasrekar died of coronavirus | उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वंदना कसरेकर यांचे कोरोनामुळे निधन

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वंदना कसरेकर यांचे कोरोनामुळे निधन

ठळक मुद्देगेल्या पाच डिसेंबरला गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जीआर उधवानी यांचे निधन झाले होते.

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वंदना कसरेकर यांचे रविवारी मेदांता रुग्णालयात कोरोनामुळे  निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर न्यायाधीश वंदना कसरेकर यांना इंदूरमधील मेंदाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एअर लिफ्ट करून दिल्लीला उपचारासाठी हलविण्याचाही विचार सुरू होता. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना शिफ्ट करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. 

एक वर्षानंतर न्यायाधीश वंदना कासेकर निवृत्त होणार होत्या. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात बराच काळ उपचार सुरू होते, असे इंदूर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अमरसिंह राठोड यांनी सांगितले. तर इंदूरमधल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वय आणि त्यांना असलेल्या इतर काही व्याधींमुळे त्यांची प्रकृती खालावत गेली. नंतर मल्टिऑर्गन फेल झाल्याने प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही, अशी माहिती कोविड नोडल अधिकारी अमित मालाकार यांनी दिली आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी न्यायाधीश वंदना कासेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान, इंदूर शहरात कोरोनामुळे ८११  जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने इंदूर उच्च न्यायालयातल्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी घेतली होती. यामध्ये तब्बल ५२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर गेल्या आठ दिवसांत देशातील दोन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या पाच डिसेंबरला गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जीआर उधवानी यांचे निधन झाले होते.
 

Web Title: madhya pradesh indore justice vandana kasrekar died of coronavirus