रुग्णावर उपचार करतानाच डॉक्टरला आला हार्ट अटॅक; क्लिनिकमध्येच घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 12:29 IST2023-11-10T12:28:23+5:302023-11-10T12:29:36+5:30
डॉक्टर दिलीप कुमार कुशवाह हे स्वतःच्या क्लिनिकमध्ये रुग्णावर उपचार करत होते. मात्र याच दरम्यान त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.

रुग्णावर उपचार करतानाच डॉक्टरला आला हार्ट अटॅक; क्लिनिकमध्येच घेतला अखेरचा श्वास
मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरलाच मृत्यूने गाठलं आहे. 38 वर्षीय डॉक्टर दिलीप कुमार कुशवाह हे स्वतःच्या क्लिनिकमध्ये रुग्णावर उपचार करत होते. मात्र याच दरम्यान त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ते आपल्या क्लिनिकमध्ये एका रुग्णाला चेक करत होते.
रुग्णाला चेक करत असतानाच डॉक्टरांना छातीत तीव्र वेदना जाणवल्या. यानंतर ते खाली पडले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. दिलीप कुमार हे होमिओपॅथीचे प्रसिद्ध डॉक्टर होते. इतरांची सेवा करण्यासाठी ते सदैव तत्पर असत.
या घटनेची माहिती मिळताच अनेक सामाजिक कार्यकर्ते तातडीने क्लिनिकमध्ये पोहोचले. शहडोल जिल्ह्यातील केसवाहीसारख्या छोट्या गावातून आलेले आणि बुरहारमध्ये क्लिनिक चालवणारे डॉ. दिलीप कुमार हे नेहमीच समाजसेवेत पुढाकार घ्यायचे. त्यांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.
एखाद्या रुग्णाकडे उपचारासाठी पैसे नसतील तर डॉक्टर त्याच्यावर मोफत उपचार करायचेच पण नंतर स्वतःहून औषधंही देत. अनेकवेळा असे दिसून आले आहे की, दिलीप कुमार हे स्वतःच्या खिशातून पैसे देऊन रुग्णांच्या वाहतुकीची व्यवस्था करत असत. आजच्या काळात अशा प्रकारची सेवा देणारे लोक दुर्मिळ आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.