नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:27 IST2025-10-14T15:26:17+5:302025-10-14T15:27:04+5:30
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील सिवनी येथे झालेल्या हवाला लूट प्रकरणामध्ये अखेर ५ दिवसांनंतर एका बड्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह ११ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवण्यात आलेल्यांमध्ये एसडीओपी पूजा पांडे आमि टीआय अर्पित भैरम यांचा समावेश आहे.

नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत
मध्य प्रदेशमधील सिवनी येथे झालेल्या हवाला लूट प्रकरणामध्ये अखेर ५ दिवसांनंतर एका बड्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह ११ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवण्यात आलेल्यांमध्ये एसडीओपी पूजा पांडे आमि टीआय अर्पित भैरम यांचा समावेश आहे. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ६ जण फरार आहेत. आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात दरोडा, अपहरण, गुन्हेगारी कटकारस्थान आदी गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशमधील सिवनी येथे ८ आणि ९ ऑक्टोबरच्या रात्री एसडीओपी पूजा पांडे यांनी एनएच-४४ वर तपासणीसाठी नाकेबंदी केली होती. यादरम्यान, नागपूरहून जबलपूरला जाणाऱ्या एका गाडीमध्ये २.९६ लाखांची हवालाची रक्कम सापडली. दरम्यान, पूजा पांडे यांनी आरोपींकडून ही सगळी रक्कम घेऊन त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता त्यांना पळवून लावल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हवाला व्यावसायिकांनी सिवनी येथील पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाची तक्रार नोंदवली. ही बाब उघडकीस येताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
त्यानंतर आयजी प्रमोद वर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसडीओपी पूजा पांडे, बंडोल पोलीस ठाण्याचे टीआय अर्पित भैरम यांच्यासह एकूण ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. तसेच प्रकरणाचा तपास एएसपी आयुष गुप्ता यांच्याकडे सोपवला. यादरम्यान, ११ ऑक्टोबर रोजी हवाला व्यावसायिक सोहन परमार, इरफान पठाण आणि शेख मुख्तार यांच्याविरोधात लखनवाडा पोलीस ठाण्यात संघटित अपराध कलम ११२ (२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न पोलीस खात्याकडून होत असल्याचे आरोप होऊ लागले. त्यातच मंगळवारी एकूण ११ पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच एसडीओपी पूजा पांडे यांच्यासह एकूण ५ आरोपींना अकट करण्यात आलं. उर्वरित ६ आरोपी फरार आहेत.