रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:19 IST2025-10-15T17:19:35+5:302025-10-15T17:19:48+5:30
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील लोकायुक्त पोलिसांनी निवृत्त जिल्हा अबकारी अधिकारी धर्मेंद्र सिंह भदौरिया यांच्या मालकीच्या विविध ठिकाणांवर टाकलेल्या धाडींमधून कोट्यवधीचं घबाड सापडलं आहे. धाडीनंतर भदौरिया यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची सुमारे १० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड
मध्य प्रदेशमधील लोकायुक्त पोलिसांनी निवृत्त जिल्हा अबकारी अधिकारी धर्मेंद्र सिंह भदौरिया यांच्या मालकीच्या विविध ठिकाणांवर टाकलेल्या धाडींमधून कोट्यवधीचं घबाड सापडलं आहे. धाडीनंतर भदौरिया यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची सुमारे १० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गैरमार्गाने संपत्ती गोळा केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र सिंह भदौरिया यांच्या ग्वाल्हेर आणि इंदूर येथील सात ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. ग्वाल्हेरमधील एका मालमत्तेवर आणि इंदूरमधील सात मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. या मालमत्ता माजी अधिकारी धर्मेंद्र सिंह भदौरिया आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर होत्या, अशी माहिती लोकायुक्त पोलिसांचे उपायुक्त सुनील तलान यांनी दिली.
तलान यांनी पुढे सांगितले की, छापेमारीदरम्यान, भदौरिया आणि त्यांच्या कुटुंबीयांकडील सुमारे ८ ते १० कोटी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली आहे. यामध्ये ग्वाल्हेर आणि इंदूर येथील मालमत्तांबरोबरच उत्तर प्रदेशमधील इटावा येथील मालमत्तेचाही समावेश आहे. याशिवाय या धाडींमध्ये सुमीरे १.०५ कोटींची रोख रक्कम, १.५० किलो वजनाचे सोन्याचे बार आणि सुमारे १ किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्याशिवाय भदौरिया कुटुंबीयांची चित्रपटांध्येही गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्यांच्याकडे सात ते आठ बँक खाती आणि लॉकर्स असल्याचेही समोर आले आहे.
धर्मेंद्र सिंह भदौरिया हे यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी आलिराजपूर येथील जिल्हा एक्स्चाइज अधिकारी या पदावरून निवृत्त झाले होते. भदौरिया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांव्यतिरिक्त इतर मार्गांनी जमवल्याचा आरोप झाला होता. लोकायुक्त पोलीस सध्या भदौरिया आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करत आहेत.