मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अचानक लाईट गेल्यामुळे ८ वर्षांचा मुलगा सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकला. वडिलांना हे कळताच मुलाचा जीव वाचवण्यासाठी ते जनरेटर रूमकडे धावले पण छातीत दुखू लागल्याने अचानक खाली पडले आणि पुन्हा उठू शकलेच नाहीत.
सोसायटीतील लोकांनी वडिलांना जवळच्या रुग्णालयात नेलं तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मिसरोड पोलीस स्टेशन परिसरातील निरुपम रॉयल पाल्म कॉलनीत ही घटना घडली. ऋषिराज भटनागर आपल्या कुटुंबासह या सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ३०७ मध्ये राहत होते.
मंगळवारी संध्याकाळी त्यांचा ८ वर्षांचा मुलगा खेळायला जात होता, याच दरम्यान लाईट गेल्याने लिफ्ट बंद पडली आणि त्यांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला. वडील ऋषिराज यांना हे कळताच ते लगेच जनरेटर रूमकडे धावले पण त्याच दरम्यान त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि ते खाली पडले.
काही मिनिटांत लिफ्ट सुरू झाली आणि मुलगा बाहेर आला पण ऋषिराज बेशुद्ध झाले होते. सोसायटीतील लोकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेलं पण तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरे कारण समोर येईल.