हृदयद्रावक! "माझ्या डोळ्यासमोरच माझा मुलगा गेला"; ASP आईवर कोसळला दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 13:50 IST2023-11-22T13:43:02+5:302023-11-22T13:50:56+5:30
एएसपी श्वेता श्रीवास्तव यांच्या डोळ्यासमोरच त्यांचा निरागस मुलगा नामिश याला एसयूव्हीने धडक दिली.

हृदयद्रावक! "माझ्या डोळ्यासमोरच माझा मुलगा गेला"; ASP आईवर कोसळला दुःखाचा डोंगर
लखनौमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एएसपी श्वेता श्रीवास्तव यांच्या डोळ्यासमोरच त्यांचा निरागस मुलगा नामिश याला एसयूव्हीने धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नामिशला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 10 वर्षांच्या नामिशचा मृतदेह पाहून आईला मोठा धक्का बसला. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
21 नोव्हेंबरच्या पहाटे जनेश्वर मिश्र पार्कजवळ ही घटना घडली. एसपी श्वेता श्रीवास्तव यांनी मुलगा नामिश याला प्रशिक्षकासोबत स्केटिंगचा सराव करण्यासाठी आणलं होतं. श्वेता जी-20 रोडवर रस्त्याच्या पलीकडे होत्या. तेव्हा भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा एक्सयूव्ही 700 ने नामिशला जोरदार धडक दिली. यानंतर गाडीचा मालक फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात मुलगा रस्त्यावर पडला होता.
अपघातानंतरचे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिक हादरले. काही क्षणांपूर्वी आनंदाने स्केटिंग करणारा निरागस नामिश आता नाही यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. हॉस्पिटलच्या बाहेर श्वेता रडत होत्या आणि माझ्या डोळ्यासमोरच माझा मुलगा गेला असं सर्वांना सांगत होत्या.
एएसपी श्वेता यांचे पती गुरुग्राममध्ये कार्यरत आहेत. मुलगा नामिशच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दुपारी रडत रडत ते लखनौला पोहोचले. एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. अपघाताची माहिती मिळताच डीजीपी विजय कुमार, स्पेशल डीजी लॉ एन्ड ऑर्डर प्रशांत कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचून त्यांचं सांत्वन केलं.