LPG To PNG: सरकारकडून सक्ती! गॅस पुरवठा बंद होऊ द्यायचा नसेल, तर किती दिवसात पीएनजी कनेक्शन घ्यावे लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:43 IST2026-03-25T18:43:06+5:302026-03-25T18:43:57+5:30
Gas Crisis Modi Government: केंद्र सरकारने २५ मार्च रोजी एका महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे ज्या ठिकाणी पाईप गॅस उपलब्ध आहे, तिथल्या नागरिकांना पीएनजी गॅस घ्यावाच लागणार आहे.

LPG To PNG: सरकारकडून सक्ती! गॅस पुरवठा बंद होऊ द्यायचा नसेल, तर किती दिवसात पीएनजी कनेक्शन घ्यावे लागणार?
Gas Shortage in India: पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. गॅस आणि तेलाची टंचाई जाणवू लागली आहे. देशातील अनेक शहरांत आणि ग्रामीण भागातही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. या परिस्थितीत केंद्र सरकारने बुधवारी (२५ मार्च) एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारने ज्या शहरांमध्ये पीएनजी गॅस उपलब्ध आहे, अशा शहरातील लोकांनी एलपीजी कनेक्शन बदलून पीएनजी कनेक्शन घ्यावे, असा सक्तीचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारकडून याबद्दल माहिती दिली गेली आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील महानगरांसह इतर काही शहरांमध्ये पीएनजी गॅस उपलब्ध आहे. अनेक कुटुंबे पीएनजी गॅस वापरत आहेत. दरम्यान, सध्या एलपीजी गॅसची आयात आणि मागणी यात समतोल करण्यासाठी केंद्र सरकारकडून लोकांना पीएनजीचा वापर करण्यास सांगितले आहे.
पीएनजी गॅस सुविधा उपलब्ध असूनही जी कुटुंबे एलपीजी गॅसचा वापर करतात. अशा वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एलपीजी वापरकर्त्यांची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जी कुटुंबे पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही कनेक्शन घेणार नाही, त्यांचे एलपीजी कनेक्शन बंद करण्यात येईल, असेही सरकारने म्हटले आहे. कनेक्शन बदलून घेण्यासाठी केंद्र सरकारने तीन महिन्यांचा वेळ दिला आहे.