सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:55 IST2026-04-09T16:54:03+5:302026-04-09T16:55:09+5:30

गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीला झालेला उशीर आणि एका साध्या 'ओटीपी' (OTP) ने ६२ वर्षीय वृद्धाला जीवदान मिळालं आहे.

lpg cylinder otp save karnataka man srinivas life who trapped inside udupi well for 3 days | सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?

सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?

कर्नाटकच्या उडुपी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीला झालेला उशीर आणि एका साध्या 'ओटीपी' (OTP) ने ६२ वर्षीय वृद्धाला जीवदान मिळालं आहे. हा वृद्ध व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून विहिरीत अडकला होता. ऐकायला हे एखाद्या चित्रपटातील सीनसारखं वाटू शकतं, पण हे वास्तव आहे. योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे या वृद्धाचा जीव वाचला आहे.

कम्बलाकाट्टे येथे राहणाऱ्या श्रीनिवास आचार्य यांच्यासोबत ही घटना घडली आहे. श्रीनिवास आपल्या घरात एकटेच राहतात. तीन दिवसांपूर्वी ते आपल्या घरातील विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक दोरी तुटली आणि ते विहिरीत पडले. वारंवार प्रयत्न करूनही त्यांना बाहेर पडता आलं नाही.

मदतीसाठी श्रीनिवास यांनी खूप आरडाओरडा केला, पण त्यांचा आवाज शेजारी कोणालाही ऐकू गेला नाही. जसजसे दिवस उलटले, तसतसे त्यांच्या स्थितीबद्दल कोणालाच काही कळालं नाही. त्यांची चौकशी करणारे कोणीही नसल्यामुळे ते विहिरीतील एका पाईपला आणि दोरीला धरून जगण्यासाठी संघर्ष करत राहिले.

श्रीनिवास यांनी गॅस सिलिंडर बुक केला होता, परंतु त्याच्या डिलिव्हरीला उशीर झाला होता. घरात गॅस संपल्यामुळे श्रीनिवास यांनी गणेश नावाच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून एक सिलिंडर घेतला होता. श्रीनिवास यांनी गणेशला सांगितलं होतं की, जेव्हा त्यांना स्वतःच्या सिलिंडरची डिलिव्हरी होईल, तेव्हा ते सिलिंडर त्यांना परत करतील.

गणेशच्या घरचाही सिलिंडर संपत आला होता. त्यामुळे त्याने सिलिंडर लवकरात लवकर मिळावा यासाठी गॅस एजन्सीशी संपर्क साधला. एक डिलिव्हरी बॉय सिलिंडर घेऊन श्रीनिवास आचार्य यांच्या घरी गेला, पण त्याला रिकाम्या हाती परत जावं लागलं, कारण डिलिव्हरीसाठी आवश्यक असलेला 'OTP' द्यायला घरात कोणीही नव्हतं.

या गोष्टीची कल्पना नसल्यामुळे गणेशने नंतर पुन्हा गॅस एजन्सीशी संपर्क साधला. जेव्हा त्याला सांगण्यात आलं की, श्रीनिवास यांच्या घरी ओटीपी देण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हतं, तेव्हा तो चिंतेत पडला. काहीतरी अघटित घडलं असावं असं त्याला वाटलं आणि तो तातडीने जवळच असलेल्या श्रीनिवास यांच्या घरी पोहोचला.

श्रीनिवास यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. गणेशने संपूर्ण घर शोधलं पण तिथे कोणीही दिसलं नाही. श्रीनिवास कोठेच न आढळल्याने गणेशचा संशय अधिकच बळावला. घराच्या आजूबाजूला शोध घेत असताना अखेर त्याने विहिरीत डोकावून पाहिलं आणि त्याला श्रीनिवास तिथे अडकलेले दिसले. त्याने तातडीने परिसरातील लोकांना बोलावलं.

स्थानिक नागरिक लगेच जमा झाले आणि त्यांनी शिडी खाली उतरवून श्रीनिवास यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन दिवसांपासून काहीही खायला मिळालं नसल्यामुळे श्रीनिवास इतके अशक्त झाले होते की, ते स्वतःहून वर चढू शकत नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एक जवान विहिरीत उतरला आणि त्याने श्रीनिवास आचार्य यांना सुखरूप बाहेर काढलं. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Web Title : सिलेंडर OTP से बची जान, 3 दिन कुएं में फंसे रहे बुजुर्ग।

Web Summary : कर्नाटक में एक 62 वर्षीय व्यक्ति को गैस सिलेंडर की डिलीवरी में देरी और ओटीपी के कारण तीन दिन बाद कुएं से बचाया गया। वह कुएं में गिर गया और निकल नहीं पाया। ओटीपी के बिना डिलीवरी न कर पाने पर डिलीवरी बॉय ने पड़ोसियों को सतर्क किया, जिससे उसे बचाया जा सका।

Web Title : OTP saves man after 3 days trapped in well.

Web Summary : A 62-year-old man was rescued from a well in Karnataka after three days, thanks to a delayed gas cylinder delivery and an OTP. The man fell into the well and was unable to escape. A gas delivery boy, unable to deliver without the OTP, alerted neighbors, leading to his rescue.