एक विवाह ऐसा भी! शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्याने केलं रुग्णाच्या मुलीशी लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:30 IST2022-05-05T15:28:52+5:302022-05-05T15:30:37+5:30
रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महिलेची मुलगी आणि रुग्णालयात महिलेची सेवा करणारा आरोग्य कर्मचारी हे दोघं लग्नबंधनात अडकले आहेत.

फोटो - आजतक
नवी दिल्ली - बिहारच्या हाजीपूरमध्ये एक अनोखा विवाहसोहळा पाहायला मिळाला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महिलेची मुलगी आणि रुग्णालयात महिलेची सेवा करणारा आरोग्य कर्मचारी हे दोघं लग्नबंधनात अडकले आहेत. आपला जावई हा आपली सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यासारखा असावा अशी महिलेची शेवटची इच्छा होती. यानंतर रुग्णाची इच्छा म्हणून आरोग्य कर्मचारी देखील लग्न करण्यास तयार झाला आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल रोजी ककरहट्टा येथे राहणाऱ्या मानिका देवी या एका दुर्घटनेच गंभीररित्या भाजल्या होत्या. त्यांना उपचारासाठी हाजीपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत मुलगी प्रीती देखील रुग्णालयात असायची. रुग्णालयातील कर्मचारी मनिंदर कुमार सिंह हा मानिका देवीची सेवा करत होता. त्याच्यावर ड्रेसिंग आणि गोळ्या औषधं देण्याची जबाबदारी होती.
प्रीतीच्या आईने उपचारादरम्यान मनिंदरला आपल्या मुलीशी लग्न करण्यास सांगितलं. रुग्णाची परिस्थिती आणि शेवटची इच्छा म्हणून मनिंदर देखील लग्न करण्यास तयार झाला. रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर हे पाहुणेमंडळी झाले आणि त्यांच्या उपस्थितीत थाटामाटात प्रीती आणि मनिंदरचं लग्न करण्यात आलं. सर्वत्र मनिंदरचं भरभरून कौतुक केलं जात आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रीतीच्या आईने जगाचा निरोप घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.