भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:32 IST2025-10-23T12:31:19+5:302025-10-23T12:32:25+5:30
Lokpal BMW Cars: या लक्झरी कारसाठी गेल्या आठवड्यात निविदा जारी करण्यात आल्या आहेत.

भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
BMW Cars for Lokpal: भारतात भ्रष्टाचाराविरोधी गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी लोकपाल नेमले जातात. हे लोकपाल आता सर्वात आधुनिक, आलिशान, सुरक्षित अशा महागड्या BMW कारमधून प्रवास करताना दिसतील. लोकपाल अध्यक्ष आणि सात सदस्य एका आलिशान पांढऱ्या BMW 3 Series 330Li मॉडेलच्या कारमधून प्रवास करताना दिसणार आहेत. ही आलिशान कार सर्वात सुरक्षित, वेगवान आणि सर्वात महागड्या कार कॅटेगरीमध्ये गणले जाते. या लक्झरी कारसाठी गेल्या आठवड्यात निविदा जारी करण्यात आल्या आहेत.
७० लाखांची आलिशान कार
लोकपालमधील उच्चपदस्थ सूत्रांनुसार, पुढील महिन्यात या कारची डिलिव्हरी केली जाण्याची शक्यता आहे. देशातील भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारावर लक्ष ठेवणाण्यासाठी लोकपाल नेमले जातात. हे लोकपाल या वर्षाअखेरीस सर्वात महागड्या कारमधून प्रवास करण्यास सुरुवात करतील. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रत्येक कारची किंमत अंदाजे ७० लाख रूपये असून एकूण सात कारसाठी भारत सरकार अंदाजे ५ कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजणार आहे.
BMW 330Li मॉडेलमध्ये खास काय?
लोकपाल अध्यक्ष आणि सदस्य अशा एकूण सात जण ज्या BMW 330Li मॉडेलमध्ये प्रवास करतील, ती कार सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज आहे. ही आलिशान कार असून सुरक्षितता आणि इतर वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. ही कार लांब-चाकांची असल्याने पटकन पिक-अप पकडते. ही कार सर्वात सुरक्षित, वेगवान आणि सर्वात आलिशान असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्या लोकपालकडे सर्वात विशेष प्रवासाची सुविधा असणार आहे.
चालकांना प्रशिक्षण दिले जाईल
या कार्स मिळाल्यानंतर बीएमडब्ल्यूकडून लोकपालच्या चालकांना आणि कर्मचाऱ्यांना किमान सात दिवसांचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. हे प्रशिक्षण त्यांना कारच्या संपूर्ण सिस्टीमबद्दल समजावण्यासाठी असेल. त्यातून कारबद्दलचे बारकावे त्यांना सांगितले जातील आणि त्यांना कार वापरण्यासाठी नीट प्रशिक्षित केले जाईल.
आलिशान कार्सवरून राजकारण तापलं
लोकपाल अध्यक्ष आणि सदस्य अशा ७ जणांना आलिशान व महागड्या कार्स देण्याच्या निविदा काढण्यात आल्याने राजकारण तापले आहे. या प्रकरणावरून राजकारणात आणि इंटरनेटवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसत आहे.